शहीद पोलीस शिपायांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

By admin | Published: June 4, 2017 12:53 AM2017-06-04T00:53:03+5:302017-06-04T00:53:03+5:30

पोलीस दल हे देशातील लोकांच्या संरक्षणाचे काम करीत असून स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही.

The sacrifice of the martyred policemen will not be wasted | शहीद पोलीस शिपायांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

शहीद पोलीस शिपायांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

Next

दिलीप भुजबळ : शहीद शिपाई विजय भोयरच्या पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलीस दल हे देशातील लोकांच्या संरक्षणाचे काम करीत असून स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. नक्षलवाद असो वा आतंकवाद माजविणाऱ्या अविवेकी बुध्दीचा वापर करु न समाजात दहशत पसरविणाऱ्या दहशतवाद्यांचा नेहमीच सामना करून आपल्या वीरतेचा समाजाला व राष्ट्राला परिचय करु न दिला आहे. नक्षल्यांशी सामना करताना शहीद झालेले विजय भोयर यांच्या वीरतेला मी सलाम करीत असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील सेलोटपार येथे भोयर कुटूंब व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त वतीने शहीद शिपाई विजय भोयर यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भूजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, जि.प.माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, इलमे, माजी पं.स.सदस्य संजय किंदरले, लोकशाहीर मधुकर बांते, सेवानिवृत्त अभियंता डी.यू. रहांगडाले, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लीलाधर पातोडे, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव दुलीचंद बुध्दे व तुलसीदास झंझाड उपस्थित होते.
३० मे २००५ रोजी सालेकसा तालुक्यातील बेवारटोला येथे नक्षल हल्ल्यात शहीद विजय भोयर यांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मृतीदिनी भोयर कुटुंबीय, ग्रामपंचायत सेलोटपार व ग्रामस्थांच्या सहभागातून शहीद विजय भोयर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विजय भोयर यांचा मरणानंतरही देशाला अभिमान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेकांना मिळणार असल्याचे डॉ.भूजबळ यांनी सांगितले.
आपल्या मार्गदर्शनात माजी आमदार दिलीप बन्सोड म्हणाले, पोलीस दलातील जवानांचे वीरमरण हे दुर्लक्षीत करु न चालणार नाही. पोलीस दलातील जवानसुध्दा आपलेच बंधू आहेत. नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विजय भोयर यांनी जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी, असा त्यांनी आदर्शबोध घेवून त्याच उमेदीने नक्षलवाद्यांशी लढले व प्राणाची आहूती दिली, असे ते म्हणाले.
यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स. सभापती उषा किंदरले, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, निलिमा इलमे, माजी पं.स. सदस्य संजय किंदरले, लोकशाहीर मधुकर बांते, सेवानिवृत्त अभियंता डी.यू. रहांगडाले, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पातोडे, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव दुलीचंद बुध्दे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक दुलीचंद बुध्दे यांनी मांडले. संचालन सेलोटपारचे सरपंच रामेश्वर हलमारे यांनी केले. आभार राधेश्याम मते यांनी मानले. कार्यक्रमात सेलोटपार व परिसराच्या गावातील नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The sacrifice of the martyred policemen will not be wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.