गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, गोरेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 08:47 PM2023-05-09T20:47:23+5:302023-05-09T20:47:54+5:30
Gondia News जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील गोरेगाव, मुरदोली जवळ मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. त्यामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. याचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्याला बसला. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. तर काही ठिकाणी विद्युत खांब सुध्दा कोसळले. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुध्दा खंडीत झाला होता. गोंदिया ते कोहमारा मार्गावर मुरदोली जवळ रस्त्याच्या मधोमध दोन ते तीन मोठी झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे याचा या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना फटका बसला. या मार्गावर रस्त्यावर पडलेली झाडे बाजुला करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.