पुलावरील सुरक्षा पाईप तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:58 PM2018-08-22T23:58:29+5:302018-08-22T23:59:41+5:30
तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाचे सुरक्षा पाईप तोडणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील लोखंडी सुरक्षा पाईप तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबीने खोदकाम केले. ग्रामपंचायतने शासकीय मालमत्तेचे नुकसान केले तर कंत्राटदाराने पाईप नेल्याचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच महेंद्र बागळे, ग्रा.पं.सदस्य रुपेश अंबुले यांनी केली आहे. रस्त्यालगतच मोठा खड्डा खोदल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याच मार्गावरुन मध्यप्रदेशातील बालाघाट व महाराष्ट्रातील वाहनाची वर्र्दळ असते. खोदकाम केलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक सुध्दा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. हे सर्व काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची सुध्दा परवानगी घेण्यात आली नाही. या विभागाचे उपविभागीय कार्यालयातील शाखा अभियंता मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता ग्रा.पं.ने कसल्याही प्रकारची मंजुरी घेतली नसल्याचे सांगितले. शिवाय यासंबंधीचे कुठलेही पत्र दिलेले नाही. दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करुन पुढील कारवाही करण्यात येईल असे सांगितले. ग्रामसेवक सोनवाने यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.