साहेब,वीज द्या हो वीज!

By Admin | Published: March 31, 2017 01:18 AM2017-03-31T01:18:25+5:302017-03-31T01:18:25+5:30

कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा

Saheb, give power, electricity! | साहेब,वीज द्या हो वीज!

साहेब,वीज द्या हो वीज!

googlenewsNext

केशोरी परिसरात शेतकऱ्यांचा टाहो : कमी वीज दाबाने शेकडो एकरातील पीक करपले
अर्जुनी-मोरगाव : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा भ्रमाचा भोपळा असल्याचे अनुभव तालुक्यातील शंभर टक्के सिंचनाखाली असलेल्या केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून येत आहे. इटियाडोह धरणापासून २४ तास सिंचनाची सोय आहे. मात्र वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील कन्हाळगाव, सातगाव, तुकुम, इळदा व धमदीटोला येथील शेतकऱ्यांचे जवळपास ७५ हेक्टर क्षेत्रातील उभे पीक करपले. पीक करपून जाण्याचे हे सतत तिसरे वर्ष आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा वीज विभागाला माहिती दिली. वीज दाब वाढविण्यासाठी निवेदने दिली. मात्र अजूनही त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा होत आहे. ज्या लोकप्रतिनिधिंनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असा भाव आणला ते सत्तेत आले व मोठे झाले. मात्र शेतकरी अजूनही उपेक्षीत आहे. केशोरी क्षेत्रातील कन्हाळगाव, सातगाव, तुकूम, इळदा व धमदीटोला येथील मागील तीन वर्षापासून कमी वीज दाबामुळे धानाचे पीक करपत आहे. या प्रकरणी वारंवार वीज विभागाला माहिती दिली जाते. मात्र या समस्येवर अजूनही तोडगा निघाला नाही. वीज दाब पूर्ववत करण्यात यावा, योग्य ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा याबाबत उपविभागीय अभियंता केशोरी, अर्जुनी-मोरगाव तथा देवरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या परिसरात आठवड्यातून मंगळवारी २४ तासांची लोडशेडिंग असते. कृषीपंपांना लोडशेडींग मुक्त करण्याची मागणी आहे. कमी वीज दाबाने शेकडो हेक्टर मधील धान पीक करपल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. सदरचा पंचनामा करुन संबंधित विभागाने नुकसान भरपाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री, उर्जामंत्री, कृषी मंत्री यांना तहसीलदारांमार्र्फत पाठविले आहे.
यावेळी मोहनलाल दमाहे, दादाजी चव्हाण, आसाराम दमाहे, उध्दव पुस्तोडे, अशोक पुस्तोडे, उत्तम देशमुख, मेहबूब पठान, जयंत रामटेके, अलीराम हुंडरी, श्रीराम झोडे, नरेश ताराम, कृष्णा घरतकर, जागेश्वर छगवा, आनंदराव रंगारी, हरपाल जांभुळकर, सुरेश मडावी, भोजराम लोगडे, दीपक चव्हाण, दिनदयाल दुधकवार, रामविलास केवास, दसरु कोल्हे, देवदत्त दूधनाग सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कमी वीज दाब व ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा येथील शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)

प्रयत्न सुरु आहेत
यासंदर्भात केशोरी येथील अभियंता जी.आय.विधानेंशी संपर्क केला असता माहिती मिळाली की, कमी वीज दाबाचा प्रश्न आहे. याबद्दल विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कृषी पंप खूप वाढले, सोबतच वीज चोरही खूप आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कमी वीज दाबाचा प्रश्न निर्माण होतो. लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून साकोली येथील सब स्टेशनमध्ये बिघाड आल्याने लाखांदूर वरुन वीज घेतली जाते;मात्र तिथून अपूर्ण पुरवठा होत असल्याने हे प्रश्न निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवरुन लवकरच तोडगा काढण्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Saheb, give power, electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.