साहेब रुग्णालयात, अंत्यसंस्कारासाठी जातोय, एसटी प्रवाशांची तीच ती कारणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:22+5:302021-05-06T04:31:22+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असून, ई-पास सेवेशिवाय जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बससेवासुद्धा अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी बससेवा सुरू असून, अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ठोस कारण दिल्यावरच एसटीत प्रवासाची मुभा दिली जात आहे. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी बहुतेक प्रवासी हे साहेब माझे नातेवाईक रुग्णालयात अखरेच्या घटका मोजत आहे, साहेब मला अंत्यसंस्कारासाठी जायचे आहे, नातेवाईक फार आजारी आहेत, ही कारणे देत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे बसमध्ये सुद्धा फारसे प्रवासी राहत नसल्याने त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जात आहे. जिल्ह्यात गोंदिया आणि देवरी असे दोन आगार असून, यात एकूण १२० बस आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या केवळ गोंदिया आगाराची १ बस सुरू आहे. ती सुद्धा नियमित नसून प्रवासी मिळाल्यास नागपूरपर्यंत सोडली जाते. एका बसमध्ये सध्या २५ पेक्षा अधिक प्रवासी राहत नसल्याचे गोंदिया आगारप्रमुखांनी सांगितले.
..........
केवळ नागपूर मार्गावर बसफेरी सुरू
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील महिनाभरापासून बससेवा जवळपास बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया आगारांपैकी केवळ गोंदिया आगारातून नागपूरसाठी एक बस सोडली जात आहे. बऱ्याचदा प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे.
...........
कोट
मागील महिनाभरापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे बसफेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. सद्यस्थितीत तर एक बस सोडली जात आहे. मात्र, तिला सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमुळे आगाराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- संजना पटले, आगारप्रमुख गोंदिया
...........
वादाचे प्रसंगच नाहीत
सध्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस सोडल्या जात आहे. त्यातच काही अत्यावश्यक कामांसाठी जाणारे प्रवासी येणे-जाणे करीत आहेत. एका बसमध्ये केवळ २० ते २५ प्रवासी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांशी वाद होण्याचे कुठलेच प्रसंग घडले नाहीत. सध्या केवळ बस नियमित सुरू आहे.
..........
जिल्ह्यातील एकूण आगार : ०२
बस चालविल्या जातात : ०१
सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या : २५ ते ३०
.................
तीच कारणे
- लॉकडाऊनमुळे जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक आहे, तर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रवासीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडत आहे.
- कुणी नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी तर कुणाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहे.
- प्रवास करताना प्रवासीसुद्धा नेमके अंत्यसंस्काराला जातो, नातेवाईक आजारी आहे, बऱ्याच दिवसांपासून कुटुंबापासून दूर आहे हीच कारणे देत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
.........