धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:09 PM2017-10-15T22:09:19+5:302017-10-15T22:09:29+5:30
दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे. दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. मात्र आता सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे.
महागाईने कळस गाठला असून यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतीही झाली नाही. परिणामी संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम व्यापारावरही काही प्रमाणात जाणवत आहे. गोंदिया येथील बाजारपेठेत गेल्या तीन-चार दिवसांपासून ग्राहकांची चांगलीच वर्दळ वाढली आहे. अशात सोनेही वधारलेले आहे. त्यातही एका तोळ्यात दागिना मिळत नसल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल आता कमी होत चालला आहे.
दिवाळीत धनोत्रयोदशीच्या दिवशी लहान का नसो मात्र नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे. आजही या जुन्या परंपरेचे अनुकरण केले जात असून धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वजण एखाद्या वस्तूची हमखास खरेदी करतात. यात धनाढ्यांकडून सोन्याची खरेदी केली जात असल्यास मध्यमवर्गीयाकडूनही भांडे, वाहन किंवा अन्य गरजेच्या वस्तूची खरेदी केली जाते. आजघडीला मात्र मध्यमवर्गीयांचा कल इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आज दररोजच्या जीवनात उपयोगी पडत असतात त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे.
ठरविलेली वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी पूर्वीपासून नियोजन केले जाते व ती वस्तू धनत्रयोदशीला खरेदी केली जाते. परिणामी चालत आलेल्या परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. मंगळवारी (दि.१७) धनत्रयोदशी येत असल्याने कित्येकांकडून आतापासूनच आवडत्या वस्तूची बुकींग केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ती वस्तू घरी नेली जाणार आहे. त्यामुळे दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
फायनान्स सुविधा व आवाक्यातही
सोन्याच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त आहेत. यात मोबाईल, लॅपटॉप, फ्रीज, टिव्ही व अन्य साहीत्यांचा समावेश करता येईल. शिवाय हे साहीत्य खरेदी करण्यासाठी आजघडीला पूर्ण रक्कम देण्याचीही गरज नाही. या वस्तू आता फायनन्स होत असल्याने काही पैसे देऊन दिवाळीची खरेदी करता येते. शिवाय आपल्या घरात गरजेची वस्तू खरेदी करून होते.
आॅनलाईन शॉपिंगची वाढली क्रेज
सध्याच्या इंटरनेट युगात शेकडो आॅनलाईन शॉपींग साईट्स आहेत. कमी दरात व हजारो वस्तू एका क्लीकवर उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा कल आॅनलाईन शॉपींगकडे वाढत चालला आहे. घरबसल्या पाहिजे ती वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत.