एक हजार कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:17+5:30
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो कर्मचारी नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने कडक पाऊल उचलले आहे. यासाठी तीन अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती जि.प.ने मागविली.परंतु कर्मचाऱ्यांची माहिती जि.प.ला पाठविण्यात आली नाही. त्यामुळे मुकाअ यांनी माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन न देण्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे माहिती न देणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अडणार आहे.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागतांना द्यावे लागते.नोकरीत लागतांना शपथपत्रात दोनच अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया यांनी यासंदर्भात तीन वेळा स्मरणपत्र देऊन सर्व खातेप्रमुखांना माहितीे मागीतली. आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरीत किती अपत्य आहेत याचे प्रमाणपत्र, शपथपत्र सादर करा असे सूचविले आहे. परंतु वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटूनही माहिती तालुकास्तरावरून जि.प.ला प्राप्त झाली नाही.
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो कर्मचारी नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपापल्या अपत्यांची खरी माहिती दिल्यास २००५ नंतर तिसरा अपत्य होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिसरे अपत्य असणाºया कर्मचारी, अधिकारी यांना घरचा रस्ता दाखविण्याची मोहीम सुरू केली आहे.
५ हजारावर कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली
नोकरी जाऊ नये यासाठी तिन अपत्य असणारे लोक दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र देत होते. परंतु आता मुकाअ यांनी चौकशीत चुकीची माहिती आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने एक हजारावर अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या लहान कुटुंब असल्याची माहितीच सादर केली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर अ, ब, क वर्गातील ६ हजार ७२५ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ हजार ६७ पदे भरली आहेत. त्यापैकी हजारावर अधिक कर्मचाऱ्यांनी ही माहिती न दिल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तीन स्मरणपत्रानंतरही माहिती न दिल्याने वेतन अडविण्याचे पत्र
जिल्हा परिषदेकडून २८ मार्च २००५ च्या सामान्य प्रशासनाच्या निर्णयाची दखल घेत १९ जुलै २०१८ ला लहान कुटुंब असल्यााचे प्रमाणपत्र सादर करा असे पत्र देण्यात आले. त्यानंतर दुसरे पत्र ५ जुलै २०१९ ला म्हणजेच वर्षभरानंतरही देण्यात आले. दोन वेळा पत्र देऊन वर्षभराचा कालावधी लोटूनही माहिती देण्यात न आल्यामुळे पुन्हा तिसरे पत्र १३ ऑगस्ट २०१९ ला देण्यात आले.परंतु तीन वेळा पत्र देऊनही कर्मचाऱ्यांची माहिती जि.प.ला न आल्यामुळे मुकाअ यांनी २६ सप्टेंबर २०१९ रोजी चवथे पत्र काढून १५ ऑक्टोबरपर्यंत माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन स्थगीत करण्याचे पत्र काढले आहे.
३४ कर्मचाऱ्यांना तीन अपत्य?
जिल्हा परिषदेला आलेल्या कर्मचाºयांच्या माहितीत ३४ कर्मचाºयांना तीन अपत्य असल्याची माहिती आहे. यातील काही लोकांना तीन अपत्य आहेत परंतु त्यांचा तिसरा अपत्य २००५ पूर्वीचा आहे. परंतु काहींना २००५ नंतरही तिसरा अपत्य झाला आहे. ज्या लोकांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अद्याप सादर केले नाही त्यात मोठ्या प्रमाणातील लोकांना तिसरा अपत्य असल्याचे बोलले जाते.
नोकरी जाईल;रिकव्हरी होणार
२८ मार्च २००५ नंतर तिसऱ्या अपत्याला जन्म देणाऱ्या पालकांची नोकरी जाणार हे निश्चीत झाले आहे. पती-पत्नी दोघेही नोकरीत असतील तर त्या दोघांचीही नोकरी जाणार आहे. आणि त्यांना तिसरा अपत्य झाला असेल त्या दिवसापासून त्यांची रिकव्हरी करण्यात येणार आहे.