बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:45 PM2017-10-13T23:45:21+5:302017-10-13T23:45:33+5:30
बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र जिल्हा कृषी विभागातर्फे अद्यापही शोध मोहीम सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कीटकनाशक फवारणीमुळे १५ ते २० शेतकºयांच्या मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेतकºयांचीे ओरड वाढल्यानंतर प्रशासनाने कृषी केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली. तसेच बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री होत आहे का? याची चाचपणी करण्याचे काम काही जिल्ह्यात कृषी विभागातर्फे सुरू आहे.
मात्र गोंदिया जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचे आदेश अद्यापही न मिळाल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ जिल्ह्यातून बनावट कीटकनाशकांची विक्री केली जाते. ही बाब कृषी विभागाच्या अधिकाºयांना माहिती आहे.
मात्र ते याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने अद्यापही जिल्ह्यातील कृषी केंद्राना भेटी देऊन बंदी असलेल्या कंपन्याच्या कीटकनाशकांची विक्री केली जात आहे का? याची चाचपणी केली नाही. त्यासाठी विशेष मोहीम देखील राबविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
दरम्यान कोणत्या कंपनीच्या कीटकनाशकांवर बंदी आहे, याची माहिती प्रसिध्द केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात आहे.