परवानगी नसतानाही मनमर्जी भावाने विटांची विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:42+5:302021-03-13T04:53:42+5:30
बिरसी-फाटा : महसूल विभागाद्वारे तालुक्यातील वीटभट्टी संचालकांना विटा तयार करून विक्री करण्याची परवानगी देण्यात येते. तरीसुद्धा विना परवाना वीटभट्टी ...
बिरसी-फाटा : महसूल विभागाद्वारे तालुक्यातील वीटभट्टी संचालकांना विटा तयार करून विक्री करण्याची परवानगी देण्यात येते. तरीसुद्धा विना परवाना वीटभट्टी संचालक विटा तयार करून मनमर्जी भावाने विक्री करीत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. या संधीचा लाभ घेऊन वीटभट्टी संचालक विना परवाना विटा तयार करून व मागणीनुसार अवैधरीत्या वाहतूक करून घरकुल लाभार्थ्यांना ७-८ हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे सर्रास विक्री सुरू केली आहे. महसूल विभागाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असलेल्या बाबीकडे या विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा राजस्व बुडत आहे.
तालुक्यात मुंडीकोटा, परसवाडा, वडेगाव, अर्जुनी यासारख्या अनेक गावांत वीटभट्ट्या सुरू आहेत. तिरोडा तहसील कार्यालयाकडून त्यांना विटा तयार करण्याचा परवाना देण्यात आलेला नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. महसूल विभागाचे सजे कार्यरत असून तलाठी, मंडळ अधिकारी, कोटवार आपापल्या सजात कर्तव्यावर आहेत; परंतु कर्मचारी कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाहीत.