१३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक

By अंकुश गुंडावार | Published: December 9, 2023 08:38 PM2023-12-09T20:38:30+5:302023-12-09T20:38:50+5:30

अटक करण्यात आलेला सातवा आरोपी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील २० खोली सुक्लुढाना येथील असून प्रवीण लक्की राजेश बरमैय्या (२७) असे त्याचे नाव आहे.

Sale of 13-year-old girl for 60,000, accused arrested after four years; Six people were already arrested | १३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक

१३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक

गोंदिया : शहरात राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीला भोपाळ येथे ६० हजार रुपयात विक्री करणाऱ्या सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात २२ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तिला विक्री करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील सातव्या आरोपीला चार वर्षानंतर ९ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला सातवा आरोपी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील २० खोली सुक्लुढाना येथील असून प्रवीण लक्की राजेश बरमैय्या (२७) असे त्याचे नाव आहे.

१ डिसेंबर २०१८ ला १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे नेण्यात आले. तेथे तिची ६० हजारात विक्री करण्यात आली. यासंदर्भात त्या मुलीच्या मामाने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २२ मार्च २०१९ ला गोंदिया शहर पोलिसांनी सात जणांवर भादंविच्या कलम ३६६ (अ), ३७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतरच अटक करण्यात आली होती. परंतु दोन आरोपी फरार होते. या दोनपैकी फरार असलेला आरोपी प्रशांत ऊर्फ चुटकी उमेशचंद पांडे (२८) रा. सुक्लुढाना याला ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तर सातवा आरोपी लक्की बरमैय्या (२५) याला ९ डिसेंबर २०२३ ला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलिस हवालदार श्यामकुमार कोरे, सुमित जांगळे यांनी केली आहे.

या प्रकरणात हे आहेत आरोपी
सुनीता मेश्राम (३२), निक्की दुर्गेश मेश्राम (३४), आशा अनिल कांबळे (४०), शुभम डेहरीया (२१), जसवंत ठाकूर (२५), प्रशांत पांडे (२८) व लक्की बरमैय्या (२७) यांचा समावेश आहे.

दलालांना मिळते मोठी रक्कम
पंजाब, हरयाणा येथे मुलींची संख्या कमी असल्याने तेथील पुरुष मंडळी मुली विकत घेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. गरिबी व अडचणीचा फायदा घेऊन गरीब मुलींच्या आई-वडिलांना तुमची मुलगी सुखी राहील, असे विविध आमिष देऊन तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या दलालांच्या शब्दात येऊन परप्रांतातील अनोळखी व्यक्तीच्या हाती अनेक जण आपली मुलगी सोपवितात. ही मुलगी मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाले आहेत. यापूर्वीही असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलगी मिळवून देणाऱ्या दलालांना मोठी रक्कम मिळत असते.

प्रौगंडावस्थेतील मुलींना आमिष
पौगंडावस्थेतील मुलींना प्रेमाच्या भूलथापा देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची विक्री परप्रांतात केली जाते. घराबाहेर मुलगा किंवा मुलगी असली तर ते इतके वेळ कुठे होते याची माहिती पालक घेत नाही, त्यामुळे समाजकंटकांना संधी साधण्याची वेळ मिळते. यातूनच असे घृणास्पद प्रकार घडतात.

Web Title: Sale of 13-year-old girl for 60,000, accused arrested after four years; Six people were already arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.