ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावून बनावट घड्याळांची विक्री; दोन दुकानांवर टाकला छापा
By कपिल केकत | Published: November 23, 2023 07:06 PM2023-11-23T19:06:51+5:302023-11-23T19:06:55+5:30
२८ हजार रुपये किमतीचे बनावट हातघड्याळ जप्त
गोंदिया : टायटन या नामांकित कंपनीद्वारा उत्पादित फास्ट ट्रॅक व सोनाटा या कंपन्यांचे लेबल वापरून तयार केलेल्या बनावट हातघड्याळ विकणाऱ्या दोन दुकानांवर शहर पोलिसांनी छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या दोन्ही दुकानांमधून पोलिसांनी २८ हजार ३८५ रुपये किमतीच्या बनावट हातघड्याळी जप्त केल्या आहेत. बुधवारी (दि.२२) दुपारी १:३० वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, शहरात टायटन कंपनीद्वारा उत्पादित फास्टट्रॅक व सोनाटा या कंपन्यांचे लेबल वापरून बनावट हातघड्याळी विकण्याचा कारभार सुरू असल्याची तक्रार कंपनीचे नवी दिल्ली येथील अधिकृत प्रतिनिधी गौरव श्यामनारायण तिवारी (वय ३७) यांनी शहर पोलिसांत दिली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी तपासचक्र फिरविली व बुधवारी (दि.२२) आरोपी मोहन प्रितमदास नागदेव (२७, रा. सख्खर धर्मशाळेचा मागे माताटोली) यांच्या कुडवा लाईन येथील ग्रीन वॉच या दुकानात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दुकानातून टायटन, सोनाटा व फास्टट्रॅक या ब्रँडेड कंपन्यांचे वेगवेगळ्या डिझाईनचे लोगो व नाव असलेल्या १६ हजार ६६० रुपये किमतीच्या हातघड्याळ जप्त केल्या.
तसेच आरोपी श्यामलाल मोहनदास बजाज (५४, रा. सुरजमल बगीचा, सिंधी कॉलनी) याच्या न्यू बजाज शॉप या दुकानात छापा घालून याच कंपन्यांचे ७१४० रुपये किमतीचे बनावट घड्याळ जप्त केले.
एवढा माल केला जप्त
पोलिसांनी या छाप्यात दोन्ही दुकानांमधून टायटन कंपनीचे सोनाटा ब्रॅंड़ लिहिलेली एकूण ११९ हातघड्याळी किंमत प्रत्येकी १४० रुपये प्रमाणे असे १६,६६० रुपये, टायटन कंपनीचे फास्टट्रॅक ब्रँड लिहिलेली एकूण ५६ हायघड्याळी प्रत्येकी ८० रुपयांप्रमाणे अशी किमती ४४८० रुपये, टायटन कंपनीचे फास्टट्रॅक ब्रॅंड लिहिलेली एकूण दोन चष्मा फ्रेम प्रत्येकी ४०रुपये अशी किमती ८० रुपये, टायटन कंपनीचे फास्टट्रॅक ब्रॅंड लिहिलेले पाच घड्याळ डायल किंमत २५ रुपये, टायटन कंपनीचे सिल्वर बेल्ट असलेली ४९ हातघड्याळी किंमत ६८६० रुपये, टायटन कंपनीचे फास्टट्रॅक ब्रॅंड लिहिलेली दोन हातघड्याळे किंमत २८० रुपये असा एकूण २८,३८५ रुपयांचा माल जप्त केला.
यापूर्वी कित्येक कारवाया
शहरात बनावट हातघड्याळ तयार करून विकल्या जात असल्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र, बनावट वस्तू तयार करून विकण्यात येत असल्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वीही कित्येक वस्तूंची हुबेहूब वस्तू तयार करून विकण्यात आल्या आहेत. यावरही पोलिसांकडून कारवाया करण्यात आल्या आहेत.