चार तालुक्यातील धानाची सालेकसाच्या केंद्रावर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 05:00 AM2022-07-17T05:00:00+5:302022-07-17T05:00:02+5:30
रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रावर ७ जुलै रोजी एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या अजब खरेदीने शासन आणि प्रशासन सुध्दा आश्चर्यचकित झाले. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर चार विभागांतर्गत सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू असून, यात धान खरेदी केंद्र संचालकांनी केलेले अनेक घोळ आता पुढे येत आहे. सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर गोंदिया, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारा जोडून धान खरेदी करण्यात आल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे या धान खरेदी केंद्र संचालकांवर आता फौजदारी आणि दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते.
रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रावर ७ जुलै रोजी एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या अजब खरेदीने शासन आणि प्रशासन सुध्दा आश्चर्यचकित झाले. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर चार विभागांतर्गत सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.
या चौकशीदरम्यान अनेक आश्चर्यकारक गोष्टी पुढे येत आहे. ज्या तालुक्यातील धान त्याच तालुक्यात विक्री करण्याचा नियम असताना सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर गोंदिया, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारा जोडून धानाची विक्री करण्यात आली आहे. यातील बरेच सातबारा बोगसदेखील आहेत. तर आधीच खरेदी करून ठेवलेल्या धानाचे लॉट एकाच दिवशी ऑनलाइन पोर्टलवर एन्ट्री करून धान खरेदीचा आकडा फुगविण्यात आला. तर शेतकऱ्यांकडून धानाचे अतिरिक्त वजन घेण्यात आले.
या सर्व बाबी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती आहे. हे अधिकारी एकत्रित अहवाल सोमवारी (दि. १८) शासनाला सादर करणार असल्याची माहिती आहे. दोषी आढळणाऱ्या धान खरेदी संचालकांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई अटळ असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चार विभागांच्या अहवालाची होणार चाचपणी
- धान खरेदी केंद्रावर झालेल्या घोळाची सध्या वेगवेगळ्या चार विभागांकडून चौकशी सुरू आहे. या चारही समित्यांकडून सोमवारी शासनाकडे अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौकशी अहवालाची चाचपणी करून नंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
ते केंद्र संचालक शोधतायत संकटमोचक
- धान खरेदीतील घोळ आता अंगावर शेकणार असल्याची बाब धान खरेदी केंद्र संचालकांच्या लक्षात येताच या संकटात कोण बाहेर काढू शकतो, यासाठी संकटमोचकाचा शोध घेतला जात असल्याची जिल्ह्याच्या वर्तुळात आहे. त्यामुळे या संस्था चालकांना यातून कोण संकट मोचक भेटतो याकडे लक्ष लागले आहे.