शाळेजवळ तंबाखू-सिगारेटची विक्री; ११ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 03:18 PM2024-09-25T15:18:32+5:302024-09-25T15:21:51+5:30

१०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री : जिल्हाभरातील पोलिस यंत्रणा सक्रिय

Sale of tobacco-cigarettes near schools; A case has been registered against 11 persons | शाळेजवळ तंबाखू-सिगारेटची विक्री; ११ जणांवर गुन्हा दाखल

Sale of tobacco-cigarettes near schools; A case has been registered against 11 persons

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
शालेय परिसराच्या १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये असा नियम असताना जिल्हाभरात सर्रास तंबाखू, सिगारेट, खर्रा विक्री केला जातो. अशा लोकांच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी मोहीम छेडली आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.२३) करण्यात आलेल्या कारवाईत ११ जण शाळा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.


यामध्ये, दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम अर्जुनी येथे आरोपी रवींद्र देवाजी कापसे (३५) याच्याकडून पाच सिगारेट पॅकेट, पाच नग ब्लॅक सिगारेट, चार नग अमेरिकन क्लब सिगारेट, तीन मार्लबोरे गोल्ड असा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस नायक टेंभेकर यांनी केली आहे. ग्राम मुरदाडा येथे आरोपी छोटेलाल सीताराम शेंडे (३५) याच्या जवळून सिगारेट व बिडीचे बंडल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस हवालदार लिल्हारे यांनी केली आहे. दवनीवाडा येथे आरोपी रुपेंद्र लिलेश्वर डोहाळे (३२) याच्याजवळून सिगारेट व तंबाखू पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी जप्त केले. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चारगाव येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी अनिकेत प्रीतलाल धावडे (२१, रा. चारगाव) याच्या जवळून तंबाखू, सिगारेट व बिडी जप्त करण्यात आले. ही कारवाई महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा जाधव यांनी केली आहे. 


आमगाव तालुक्यातील ग्राम किकरीपार येथे राजू सखाराम थेर (५०, रा. किकरीपार) हा शालेय परिसरात तंबाखू व बिडी विक्री करीत असताना पोलिस शिपाई विवेक कटरे यांनी त्याला पकडले. दत्तात्रय नगर किडंगीपार येथे सदाशिव नारायण शेंडे (५०) याच्या जवळून तंबाखू, पान मसाला व सिगारेट जप्त करण्यात आले. ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुलचूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे देवेश भाऊराव वरकडे (४५) याच्याजवळून तंबाखू, सिगारेट व खर्रा महिला पोलिस शिपाई वर्षा बावनथडे यांनी जप्त केला. तसेच विलास अनंतराम नागोसे (४८, रा. मुरी) याच्या जवळून तंबाखू जप्त केली. ग्राम सतोना येथील जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेच्या परिसरात आरोपी राहुल अंगध्वज बारमाटे (३२) याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ पोलिस शिपाई कशीश परिहार यांनी जप्त केले. आमगाव तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे आरोपी भूपेश घनश्याम बावनकर (२८, रा. कुंभारटोली) याच्या जवळून सिगारेट पॅकेट व बिडी पोलिस शिपाई बिसेन यांनी जप्त केले. 


तसेच आमगाव येथील विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज समोर आरोपी रियाज कादिर खान (३६, रा. तुकडोजी चौक, आमगाव) याच्या पानटपरीतून तंबाखू, पान मसाला व सिगारेट असे साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यांत सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने कायदा कलम ६ (ब), २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Web Title: Sale of tobacco-cigarettes near schools; A case has been registered against 11 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.