आता स्वस्त धान्य दुकानातून होणार स्टेशनरी साहित्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 04:08 PM2019-10-31T16:08:28+5:302019-10-31T16:15:13+5:30
स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे. यासंबंधिचा निर्णय शासनाने ३० ऑक्टोबर रोजी घेतला असून याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर संकट ओढवण्याची शक्यता असून बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने शिधापत्रिकधारकांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात गहू,तांदूळ, तेल, साखर, तूरदाळ, चनादाळ उपलब्ध करुन देत आहेत. याचा लाभ केसरी आणि बीपीएल,अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अन्न धान्य वितरणाच्या बदल्यात मिळणारे कमिश्न फार कमी असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. त्यामुळे ही नाराजी दूर करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य आणि शालेय उपयोगी वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेशनरी साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीशी थेट करार करुन कमिश्न निश्चित करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेनरी आणि शालेय उपयोगी साहित्य ठेवता येणार आहे. स्वस्त धान्य दुकान हे ग्रामीण भागात अधिक असून नियमित स्वस्त धान्याची उचल सुध्दा याच भागातील शिधापत्रिकाधारक हे अधिक प्रमाणात करतात. मात्र या निर्णयाचा काही स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागे आधीच भरपूर कामे आहेत त्यात तो स्टेशनरी साहित्य विक्री करणाºया कंपनीचा शोध घेऊन त्यांच्याशी करार केव्हा करणार, शिवाय कंपनीवर त्यांचे वजन पडणार का? त्यांना कंपनी योग्य प्रमाणात कमिश्न देणार का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ग्रामीण भागात पुन्हा बेरोजगारी वाढणार
स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांना बसणार आहे. ग्रामीण भागात छोट्या छोट्या दुकानामध्ये स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री केली जाते. यातून गावातील छोट्या दुकानदारांची रोजी रोटी चालते. मात्र आता स्वस्त धान्य दुकानातून हे साहित्य विक्री केल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाणार असून पुन्हा बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमी जागेची समस्या
स्वस्त धान्य दुकान हे फार कमी जागेत असते. त्यातच अन्नधान्याचे पोते आणि इतर साहित्यामुळे जागाच शिल्लक राहत नाही. त्यातच आता स्टेशनरी साहित्य विक्री करायचे म्हटल्यास ते साहित्य ठेवण्यासाठी जागा लागेल, शिवाय त्यांना मनुष्यबळ सुध्दा वाढवावे लागेल. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना आधीच मिळणारे कमिश्न हे अल्प असल्याने त्यातच मनुष्यबळ ठेवल्यास त्याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये फारसा उत्साह नाही.
शासनाच्या नवीन धोरणामुळे आधीच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही ढासळत चालली आहे.त्यातच आता स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.