सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव शंभरीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:40+5:302021-05-27T04:30:40+5:30
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून तिरोडा हे सुद्धा शहर असून नगर परिषदेचे ठिकाण आहे. यामुळे या दोन शहर व ...
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून तिरोडा हे सुद्धा शहर असून नगर परिषदेचे ठिकाण आहे. यामुळे या दोन शहर व तालुक्यांत सर्वाधिक वर्दळ असते यात शंका नाही. गोंदियात अवघ्या जिल्ह्यासह लगतच्या राज्यातील नागरिकांचेही दररोजचेच आवागमन असते. तिरोडा येथेही यापेक्षा कमी प्रमाणात मात्र शहर असल्याने वर्दळ असते. परिणामी या दोन शहर व तालुक्यांत कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात लॉकडाऊन असले तरी नागरिकांचे घराबाहेर पडणे कमी होत नसून हीच संधी कोरोनाला फोफावण्यास पोषक ठरली. परिणामी गोंदिया व तिरोडा हॉटस्पॉट होते.
मात्र आता सध्याची स्थिती बघता तिरोडा तालुक्यात फक्त ८ क्रियाशील तर गोंदिया तालुक्यात ९५ क्रियाशील रूग्ण आहेत. यावरून या दोन तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोना बळावल्याचेही दिसत आहे. कारण, मंगळवारी सालेकसा तालुक्यात १३९, सडक-अर्जुनी तालुक्यात ११२ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १२२ क्रियाशील रूग्ण होते. म्हणजेच क्रियाशील रूग्णांची संख्या शंभरीपार होती.
--------------------------------
तिरोडा तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर
बाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व सुरूवातीपासूनच कोरोना हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यात मंगळवारी फक्त ८ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना उतरतीवर असल्याने बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणारे जास्त असल्याने व असेच चित्र राहिल्यास तिरोडा तालुका कोरोनामुक्त होऊ शकतो.
-------------------------------
गोंदिया तालुकावासीयांनो खबरदारी घ्या
गोंदिया शहर व तालुका सुरूवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र आता रिकव्हरी रेट वाढल्याने येथे कोरोना नियंत्रणात येताना दिसत आहे. हेच कारण आहे की, २१०६३ एवढी बाधितांची संख्या असताना सध्या ९५ क्रियाशील रूग्ण तालुक्यात शिल्लक आहे. मात्र असे असतानाही कोरोनाचा धोका टळला अशी समजूत बाळगून मनमर्जीपणा करणे धोक्याचे ठरणार आहे. दुसऱ्या लाटेने हे दाखवून दिले असून आता तरी गोंदिया शहर व तालुकावासीयांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.