शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्याच्या धानाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:40 PM2018-12-27T20:40:37+5:302018-12-27T20:41:24+5:30
जिल्ह्यातील काही शासकीय धान खरेदीे केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर विक्री केला जात आहे. यासाठी व्यापारी बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे सांगत त्यांची बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षरी घेतली जात असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील काही शासकीय धान खरेदीे केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर विक्री केला जात आहे. यासाठी व्यापारी बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे सांगत त्यांची बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षरी घेतली जात असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यात यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाची एकूण शंभरावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शासनाने यंदा सर्वसाधारण धानाला १७५० व अ दर्जाच्या धानाला १७७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदा सर्वच धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात असून रेकार्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज या दोन्ही विभागाने वर्तविला आहे. काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना १२०० ते १४०० रूपये प्रती क्विंटल दराने विक्री केली. अशा शेतकऱ्यांची संख्या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. काही व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत शेतकºयांनाकडून १२०० ते १४०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केलेला धान जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर हमीभावाने विकण्यासाठी शक्कल लढविली आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केला जात नसल्याने काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर धानाची विक्री करणे सुरू केले आहे. धान विक्री केल्यानंतर त्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. मात्र ही सुध्दा अडचण जावू नये यासाठी व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्याच्या नावावर धानाची विक्री केली त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षऱ्या घेवून सदर रक्कम विड्राल करीत आहे. हा प्रकार आमगाव तालुक्यातील एका केंद्रावर घडल्याची माहिती आहे. याची अधिक चौकशी केली असता केवळ आमगावच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही केंद्रावर असाच प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पूर्णपणे डोळेझाक केली आहे.
केंद्रावर सोयी सुविधांचा अभाव
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. मात्र अद्यापही बऱ्याच केंद्रावर सोयी सुविधांचा अभाव असल्याने शेतकºयांचे धान चोरीला जात असल्याचे प्रकार सुध्दा घडले आहेत.
महाराषष्ट्रातील धान छत्तीसगड, मध्यप्रदेशात
मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील सरकारने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर महाराष्ट्रात केवळ १७५० रुपये भाव मिळत आहे. प्रती क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपये मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अधिक मिळत असल्याने मागील आठवडाभरापासून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात धान या दोन्ही राज्यात जात आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी केला जातो. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा धान विक्री करण्याचा प्रकार आढळल्यास निश्चित संबंधितावर कारवाई केली जाईल.धान खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
- मनोज गोनाडे,
ा्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदिया.