मतदारांच्या संपर्कासाठी समर्थ बुथ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:39+5:302021-08-13T04:32:39+5:30
सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल सुरू नसते. ...
सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल सुरू नसते. त्यामुळेच निवडणूक असो वा नसो सर्वसामान्यांशी संपर्क सातत्याने ठेवण्यासाठी पक्षासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणजे समर्थ बुथ अभियान मतदारांच्या संपर्कासाठी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
राज्यभरात भाजपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या समर्थ बुथ अभियानांतर्गत तालुक्यातील कोहमारा व खोबा येथील बुथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष अशोक लंजे, लक्ष्मीकांत धानगाये, किसान आघाडी प्रदेश सदस्य राजेश कापगते, महामंत्री श्रीधारी हत्तीमारे, शिशिर येळे, उपाध्यक्ष कविता रंगारी, शीला भेंडारकर, शक्ती केंद्रप्रमुख डिलेश सोनटक्के, प्रल्हाद वरठे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अभियानाची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगून हे अभियान यशस्वी करून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याच्या वतीने संघटनात्मक भेट द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. समर्थ बुथ अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम करावे, असे सांगितले.