एकाच दिवशी तीन सदस्यांनी दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:00+5:302021-04-11T04:28:00+5:30
मुंडीकोटा : मागील ३ वर्षांपासून सरपंच कोणत्याही योजनांची माहिती देत नाही. त्यामुळे जनतेला कोणत्याही योजना व प्रभागात होत असलेल्या ...
मुंडीकोटा : मागील ३ वर्षांपासून सरपंच कोणत्याही योजनांची माहिती देत नाही. त्यामुळे जनतेला कोणत्याही योजना व प्रभागात होत असलेल्या कामांबद्दल काहीही समजावून सांगण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे कारण पुढे करून तालुक्यातील ग्राम मुंडीकोटा येथील ग्रामपंचायतच्या ३ सदस्यांनी गुरूवारी (दि. ८) राजीनामा दिला. एकाच दिवशी तीन सदस्यांनी राजीनामा दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
पदाचा राजीनामा देणाऱ्यात संगीता किशोर कोडवते, शैलेश मनोहर भोंडे व स्वप्निल सुभाष भांडारकर यांचा समावेश असून ते प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य आहेत. राजीनाम्यानुसार, मागील ३ वर्षांपासून ते गावातील प्रभाग क्रमांक १ चे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु सरपंच हे प्रभाग क्रमांक-१ बाबत किंवा इतर प्रभागांविषयी कुठलीही माहिती त्यांना देत नसून सर्व कामे आपल्या मनमर्जीने करतात. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांना विचारणा केली. मात्र,सरपंचांनी मला कोणत्याही सदस्याला सांगायाची किंवा विचारायाची गरज नाही, मला गावाने निवडून दिले आहे असे उत्तर देऊन गप्प राहायला सांगतात. या प्रकारामुळे ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही योजनेविषयी काहीही माहिती होत नाही. परिणामी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ते असमर्थ ठरतात. अशात या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामाच देऊन टाकला आहे.