एकाच पावसाने पुलावरील स्लॅब गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:34 PM2018-07-27T23:34:12+5:302018-07-27T23:35:45+5:30
आमगाव तालुक्यातील बोरकन्हार-भजेपार मार्गावरील पुलाचे स्लॅब पहिल्याच पावसाने वाहून गेला. दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला पुलाची अवस्था दयनिय झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : आमगाव तालुक्यातील बोरकन्हार-भजेपार मार्गावरील पुलाचे स्लॅब पहिल्याच पावसाने वाहून गेला. दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला पुलाची अवस्था दयनिय झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बोरकन्हार ते भजेपार मार्गाचे डांबरीकरणाचे व पुलाचे काम तिरोडा येथील कंत्राटदाराला देण्यात आले होते. या पुलाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करायचे होते.त्यानुसार कंत्राटदाराने एप्रिल-मे महिन्यात काम पूर्ण केले. याच मार्गावरुन एक मोठा नाला वाहतो. त्या नाल्यावर वाहतुकीसाठी जुना पूल होता. मात्र जुना पूल जीर्ण झाला होता. नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले होते. पण पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने नवीन पूल तयार न करता जुन्याच पुलावर सिमेंट-कांक्रीटचा थर चढवून काम केले. थातूरमातूर काम केल्याने पहिल्याच पावसात पुलाची ऐसीतैशी होऊन पुलावरील स्लॅब पूर्णपणे उखडले. पुलावरील काँक्रीटचे थर एकावर एक झाल्याने या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. २६ जुलैला रात्री उपसरपंच कैलाश बहेकार हे दोन सहकाऱ्यांसह या पुलावरुन जात असताना झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. पुलाची स्थिती बिकट झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही याची दखल घेवून पुलाची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या पुलावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भजेपारवरुन आमगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना हा मार्ग जवळ असल्याने याच मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते. दोन महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या पुलाची अल्पावधीत ही अवस्था झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी भजेपारचे सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलाश बहेकार व ग्रा.पं.सदस्यांनी केली आहे.