तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी
By admin | Published: July 21, 2014 11:56 PM2014-07-21T23:56:22+5:302014-07-21T23:56:22+5:30
पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी,
काचेवानी : पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी, असा सल्ला तिरोडा कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी पावसाच्या अभावाने बळीराजा खूप धास्तावला आहे. कडक उन्हामुळे पेरण्यांचे अंकुर वाळले आहेत. वरचे धान्य चिमण्या-पाखरांनी वेचून आपले आहार बनविले. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमधील ५० ते ६० टक्के बियाणे नाहिसे झाले. वास्तव म्हणजे यावेळी पेरणी करायची की नाही अशा गंभीर विचारात बळीराजा पडलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी केलेली आहे. अशीच परिस्थिती असली तर दुबार पेरणीसुद्धा नष्ट होईल.
यावर तिरोडा कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, यावर्षी पाऊस उशिरा येणार असला तरी पाऊस समाधानकारक होईल. पेरण्या बिघडल्या, ५० ते ६० टक्के रोपे नाहिसे झाले. तरी शेतकऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. शेतकऱ्यांनी हिंमत बांधून आणि संयम बाळगून सतर्कतेने शेतीची रोवणी करण्याचा सल्ला रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला.
पेरण्या बिघडल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या कमीत कमी २५ ते ५० टक्के जमिनीत रोवणीची कामे होणार नाहीत. परंपरागत पद्धतीने रोवणी केल्याने ही समस्या उद्भवणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीमध्ये (श्रीपद्धती) व कृषी विभागाच्या सल्ल्याने रोवणीचे कार्य केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे मत मंडळ कृषी अधिकारी रहांगडाले यांनी लोकमतजवळ व्यक्त केले.
२५ बाय २५ सेमी अंतरावर श्रीपद्धतीने पेरणी करून एक किंवा दोन रोपे लावावी. बांधीत पाणी ठेवू नये व बांध्या वाळणार नाही याची काळजी घेवून रोवणीचे कार्य केल्यास दुबार पेरण्या करण्याची गरज भासणार नाही. आणि रोपे कमी असल्याने शेती पडीक राहण्याची समस्या उद्भवणार नाही. शासकीय यंत्रणा आणि कृषी विभाग शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल चिंतेत असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे तात्काळ कामे केली जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्या योजना व सुविधांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीत विशेषत: हिंदू धर्मामध्ये आजही धार्मिक विधीला, नक्षत्रांना मान्यता आहे. पुरातन काळापासून आजही ईश्वरीय शक्तीवर विश्वास आहे. पावसाळ्याचे दिवस आले की प्रत्येक व्यक्ती नक्षत्र केव्हा लागणार आणि केव्हा बदलणार, याकडे लक्ष ठेवतो. मृग नक्षत्रात पेरण्या करणे योग्य असते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पेरण्या वेळेत झाल्या. अर्दळा नक्षत्रात पाऊस भरपूर येतो, अशी शेतकऱ्यांची आशा असते. परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा तळागाळाला गेली आणि त्यांना निराश व्हावे लागले.
सध्या फुक आणि यानंतर फुंडरस या नक्षत्रात पाऊस जोर पकडत नाही, अशी समजूत आहे. यानंतर नक्षत्र असरका लागणार असून या नक्षत्रात भरपूर पाऊस येतो. या नक्षत्रात रोवणी केल्यास ‘असरकाच्या सुटल्या पेंड्या आणि धान झाले कुडो खंड्या’ अशी शेतकऱ्यांची समजूत आहे.
निसर्गाने आताही साथ दिल्यास शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळू शकते. पेरण्या बिघडल्या, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे खरे. मात्र आताही निसर्गाने कृपा केली तर शेतकऱ्यांचा लाग होईल. (वार्ताहर)