Sameer Wankhede : आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, लाल कपड्यावरुन मलिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:40 PM2021-10-30T18:40:55+5:302021-10-30T18:56:16+5:30
या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत,
गोंदिया - सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील... आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. गोंदिया जिल्हयाच्या दौर्यावर असताना माध्यमांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत, असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी नाव न घेता केला. मी भंगारवाला आहे... अशा रद्दी माझ्याकडे दहा-वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही... आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही... बँका बुडवल्या नाहीत... त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे... कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे... त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या... क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले... आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे... इतकं का घाबरताय असा सवालही मलिक यांनी विचारला.
समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी
एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केलं जातंय. एका कोर्या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.