रेती माफियांची प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:02 PM2018-07-02T22:02:18+5:302018-07-02T22:04:22+5:30
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ वरुन नदीपात्रात पोकलॅन लावून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. या घाटावरुन दररोज शेकडो ट्रक रेतीची वाहतूक सुरू आहे. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असून तालुका महसूल प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे रेती माफीया प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत रेतीची तस्करी असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ वरुन नदीपात्रात पोकलॅन लावून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. या घाटावरुन दररोज शेकडो ट्रक रेतीची वाहतूक सुरू आहे. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असून तालुका महसूल प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे रेती माफीया प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत रेतीची तस्करी असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक महसूल गौण खनिजातून मिळतो.तर रेती घाटांच्या लिलावातून प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण रेती घाटांमध्ये तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा घाट क्रमांक १ व २ चा समावेश आहे. महसूल विभागाने या घाटाचा लिलाव केला आहे. तसेच लिलावा दरम्यान काही अटी शर्ती लागू केल्या आहे. त्यात नदीपात्रातून पोकलॅन लावून रेतीचा उपसा करता येत नाही. जेवढ्या रेतीची रॉयल्टी घेतली जाते तेवढाच उपसा करता येतो. मात्र तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटाला हे सर्व नियम लागू होत नसल्याचे चित्र आहे. या रेतीघाटावर नदीपात्रात पोकलॅन लावून रेतीचा उपसा सुरू आहे. ज्या परिसरात रेतीचा उपसा करण्याची परवानगी आहे.त्या परिसरातून रेतीचा उपसा न करता प्रत्यक्षात दुसºयाच परिसरातून रेतीचा उपसा केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर या परिसरातील रस्त्यांची सुध्दा वाट लागली आहे. येथील रेती घाटावरुन होत असलेली रेतीची अवैध तस्करी थांबविण्यासाठी घाटकुरोडा येथील गावकरी व जि.प.सदस्यांनी तहसीलदार व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी कारवाई करण्याऐवजी उलट तक्रारकर्त्यांनाच असा काहीच प्रकार सुरू नाही, आम्ही रेती घाटाला भेट दिली तेव्हा आम्हाला पोकलॅन दिसले नाही, नियमानुसारच रेतीची वाहतूक सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासन कारवाई करणार नसेल तर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांर्भीयाने दखल घेत ३० जूनला घाटकुरोडा रेती घाटावर सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी सालेकसाचे नायब तहसीलदार शिवराज खाडे यांना पाठविले. त्यांनी मौका चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र तोपर्यंत स्थानिक तालुका प्रशासन बघ्याची भूमिका घेवून होते. यावरून रेतीमाफीयांचे नेटर्वक किती स्ट्रांग आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
स्ट्राँग नेटवर्क
या रेतीघाटावरुन अवैध रेतीचा उपसा करण्यासाठी काही रेतीमाफीयांनी या परिसरात स्ट्राँग नेटवर्क तयार केले आहे. कुठले चारचाकी वाहन अथवा दुचाकी वाहनाने कुणी रेती घाटाकडे जात असल्याचे दिसताच याची माहिती रेतीघाटावर रेतीचा उपसा करीत असलेल्या पोकलॅन व ट्रक चालकाला दिला जातो. त्यानंतर लगेच पोकलॅन नदीपात्राबाहेर काढले जाते. तर ट्रक एलोरा पेपर मिलकडे जाणाºया मार्गावर उभे केले जातात. यासाठी रेती तस्करांनी काही स्थानिकांना सुध्दा सोबत घेतल्याचे बोलल्या जाते. यामुळे रेतीमाफीयांचे नेटवर्क स्ट्राँग असल्याचे चित्र आहे.
रस्त्यांची दुर्दशा
घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीचा उपसा करुन त्याची घोगरा, मुंडीकोटा मार्गे वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने या परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून त्यावरुन वाहने चालविणे सोडा पायी जाणे सुध्दा कठीण झाले आहे. घोगरा ग्रामपंचायतने यासंबंधात अनेकदा तक्रार केली मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
विना क्रमांकाच्या ट्रकने वाहतूक
घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन नागपूर, अकोला तसेच मध्यप्रदेशात रेतीची वाहतूक केली जात आहे. वाहतूक करणारे ट्रक थेट नदीपात्रात उतरवून त्यात पोकलॅनव्दारे रेतीचा उपसा करुन ती ट्रकमध्ये भरली जाते. विशेष म्हणजे रेतीची वाहतूक करणाऱ्या काही ट्रकला नोंदणी क्रमांकच नाही. त्यामुळे एखाद्या ट्रकचा क्रमांक घेऊन तक्रार करतो म्हटल्यास ती करण्याची अडचण जाते.
कारवाई टाळण्यासाठी शक्कल
घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची नागपूर तसेच मध्यप्रदेशात वाहतूक केली जाते. वाहतूकी दरम्यान महसूल आणि पोलीस विभागाची कारवाई टाळण्यासाठी ट्रकमध्ये रेती भरुन मागील बाजूने टमाटरचे कॅरेट ठेवले जातात. त्यामुळे ट्रकमध्ये रेती असल्याचे सहजासहजी कुणाच्या लक्षात येत नाही. ही सर्व शक्कल कारवाई टाळण्यासाठी केली जात असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
पोकलॅन रस्ता कामासाठी?
घाटकुरोडा रेती घाटावरुन सर्रासपणे पोकलॅन लावून रेतीचा उपसा केला जात असल्याची बाब आता लपून राहिली नाही. मात्र अधिकारी अथवा इतर व्यक्ती जेव्हा रेतीघाटावर जाऊन या पोकलॅन येथे कशासाठी असे विचारात तेव्हा ते रस्ता तयार करण्यासाठी आणल्याचा देखावा निर्माण केला जातो. हा सल्ला देखील रेतीमाफीयांना नेटवर्कमधील काहींनी दिल्याचे बोलल्या जाते.
रेती घाटावरुन पोकलॅन लावून रेतीचा उपसा केल्या जात असल्याची तक्रार प्राप्त झाली.त्यानंतर प्रत्यक्षात रेतीघाटाला भेट देवून पाहणी केली असता असा काहीच प्रकार आढळला नाही.
- संजय मेश्राम, तहसीलदार तिरोडा
मागील काही दिवसांपासून घाटकुरोडा रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा होत असल्याची व त्यामुळे गावातील रस्ता खराब झाल्याची तक्रार तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई झाली नाही.
- मनोज डोंगरे, जि.प.सदस्य.
महसूल विभागाने गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेवून वेळीच कारवाई न केल्यास या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू.
- मनोहर राऊत, पं.स.उपसभापती तिरोडा
गावातून रेतीची वाहतूक करणारे जडवाहने जात असल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. त्यामुळे महसूल विभागाने रस्ता तयार करण्यासाठी निधी द्यावा.
-गीता देव्हारी, सरपंच घोगरा.