जिल्ह्यातील ३३ घाटांवर रेती माफियांचा धुमाकूळ

By Admin | Published: January 7, 2016 02:19 AM2016-01-07T02:19:30+5:302016-01-07T02:19:30+5:30

पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळाही संपत आला आहे. मात्र जिल्ह्यातील महत्वाच्या ३३ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी ...

The sand mafia erupted on 33 Ghats in the district | जिल्ह्यातील ३३ घाटांवर रेती माफियांचा धुमाकूळ

जिल्ह्यातील ३३ घाटांवर रेती माफियांचा धुमाकूळ

googlenewsNext

मंजुरीसाठी अडला लिलाव : पर्यावरण समितीच्या ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा
गोंदिया : पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळाही संपत आला आहे. मात्र जिल्ह्यातील महत्वाच्या ३३ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी त्यांचा लिलाव करण्यास राज्याच्या पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. एकीकडे रेतीची मागणी वाढत असताना लिलाव प्रक्रिया न झाल्यामुळे रेती माफिया रात्रीचा दिवस करून या रेतीघाटांमधून अवैध प्रकारे रेतीचा उपसा करीत आहेत. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत घाटांमध्ये जमा झालेल्या रेतीसाठ्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर कोणत्या घाटातून किती रेतीचा उपसा करता येईल याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्या आधारे रेतीघाटांची अपसेट किंमत ठरवून ती मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविली जाते. आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण समितीकडे पाठविला जातो. गोंदियातील ३३ रेतीघाटांच्या लिलावास परवानगी मिळावी यासाठी गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून प्रतीक्षा सुरू आहे.
एकीकडे घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असताना दुसरीकडे बांधकामे वाढल्यामुळे रेतीची मागणी होत आहे. याचा फायदा घेत रेती माफियांकडून अवैधपणे रेतीचा उपसा सुरू आहे. दिवसा महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चकमा देत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जेसीबी लावून रेतीचा उपसा व वाहतूक केली जात आहे.
गेल्यावर्षीच्या लिलावात न गेलेले १३ घाट यावर्षी लिलावात काढण्यात आले होते, मात्र त्यापैकी फक्त ७ घाटांचा लिलाव होऊ शकला. गेल्यावर्षी खनिकर्म विभागाने एकूण ४३ घाट लिलावात काढले होते. त्यापैकी ३२ घाट लिलावात गेले. त्यातून जिल्हा प्रशासनाला ५ कोटी १२ लाखांचा महसूल मिळाला होता. (जिल्हा प्रतिनिधी)

सडक-अर्जुनी तालुक्यात वाढली रेती तस्करी
सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनीअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव-डेपो सहवन क्षेत्रातील कम्पार्टमेंट नंबर ५४९ मध्ये अवैध रेती उत्खनन होत असल्याची बाब पुढे येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून डोंगरगाव-डेपो ते सालेधारणी रस्त्यावरील नाल्यामधून जंगलाच्या अंतर्गत मार्गामधून रात्रीच नाही तर दिवसाही रेतीची चोरी होत आहे. या नाल्यामधून गेल्या तीन महिन्यात जवळ-जवळ ४०० ट्रीप रेती चोरीला गेल्याचे कळते. रेती तस्करांनी रेती आणण्यासाठी जंगलातील मौल्यवान वृक्षाची कटाई करून रस्ता तयार केला आहे. गोंदियाच्या फिरत्या पथकाच्या माध्यमातून सदर रेती चोरीला आळा बसणे अपेक्षित होते, पण सडक-अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव-डेपो, पांढरी, कोसमतोंडी, सौंदड, पिपरी, वडेगाव, चिखली, रेंगेपार या परिसरातील रेती तस्करी बंद झालेली नाही.सदर रेती ही देवरी, गोरेगाव, साकोली या शहराकडे विकली जात आहे. या यामुळे रेती माफिया गब्बर झाले आहेत. अतिरिक्त रेती उपशामुळे जमिनीची धूप होत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील वनविभाग व महसूल विभाग झोपेचे सोंग घेऊन मलाई खात असल्याचे चित्र पहावयास दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The sand mafia erupted on 33 Ghats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.