रेती माफियांनी लावली रस्त्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:16 PM2018-07-05T22:16:19+5:302018-07-05T22:16:55+5:30
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने घोगरा, मुंडीकोटा गावातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने घोगरा, मुंडीकोटा गावातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. रेती माफियांनी या परिसरातील रस्त्यांची पार वाट लावल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा रेती घाट तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा परिसरात आहे. या रेती घाटाच्या लिलावातून खनिकर्म विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे या रेती घाटावरुन अवैधपणे रेतीचा उपसा केला जात होता. रेती माफिया थेट नदीपात्रात पोकलॅन लावून रेतीचा उपसा करीत होते. शिवाय ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात होती. या रेतीघाटारुन मध्यप्रदेशात सुध्दा रेतीची तस्करी केली जात होती. दिवसभरात रेती घाटावरुन शंभरावर ट्रकची वाहतूक सुरू असते. त्यामुळे घोगरा आणि मुंडीकोटा परिसरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. परिणामी शाळेकरी विद्यार्थी व गाकऱ्यांना या रस्त्यांवरुन ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेती घाटाच्या लिलावातून महसूल विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. यापैकी केवळ १० टक्के निधी ग्रामपंचायतला दिला जातो. तेवढ्या निधीतून रस्त्यांची दुरूस्ती करणे शक्य नसून उलट ग्रामपंचायतला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
रेतीची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनामुळे गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतला अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देवून केली. मात्र त्यांनी अद्यापही गावकºयांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
अहवालात नेमके काय?
घाटकुरोडा रेतीघाटावरुन सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच या रेती घाटावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल तयार केला असून तो जिल्हाधिकाऱ्यांना सोपविल्याची माहिती आहे.
घाटावर सगळे आलबेल तर आता बंद का?
घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन नदीपात्रात पोकलॅन लावून रेतीचा उपसा केला जात होता. तसेच ज्या ठिकाणावरुन रेतीचा उपसा करण्याची परवानगी नाही. त्या परिसरातून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. मात्र यासंदर्भात तहसीलदारांनी तेव्हा असा काहीच प्रकार सुरु नसल्याचे सांगितले होते. मात्र लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मागील दोन दिवसांपासून रेती घाटावरुन रेतीचा उपसा करणे बंद आहे. घाटालगत असलेले पोकलॅन हटविण्यात आले. त्यामुळे घाटावर आधी सर्व आॅलबेल होते तर आता रेती घाटावरुन उपसा करणे बंद का केले असा सवाल उपस्थित केला जात आहे.