चौकशीच्या नावावर सारवासारव

By admin | Published: January 6, 2016 02:14 AM2016-01-06T02:14:34+5:302016-01-06T02:14:34+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शासकीय आश्रम शाळेत व्यवस्थापनाच्या हलगर्जी व ....

Saras Sarasarava in the name of inquiry | चौकशीच्या नावावर सारवासारव

चौकशीच्या नावावर सारवासारव

Next

दोषींना निलंबित करा : प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न
शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शासकीय आश्रम शाळेत व्यवस्थापनाच्या हलगर्जी व मनमर्जी कारभाराने अनेक गैरप्रकार घडत आहेत. या गैरकारभाराची चौकशीच्या नावावर सारवासारव करून पांघरुण घालण्याच्या प्रयत्न प्रकल्प अधिकारी करीत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची मागणी पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी संघटनेने लेखी निवेदनातून केली आहे.
सदर शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शाई वाळत नाही तर दुसरे प्रकरण विद्यार्थिनीला गर्भधारणा होऊन मूल झाल्याचे प्रकरण उजेडात आले. दोन्ही प्रकरणांची माहिती प्रकल्प अधिकारी गिरिश सरोदे यांना देण्यात आली. परंतु दोषींवर कारवाई न करता चौकशीच्या नावावर सारवासारव करून पांघरून घालण्यात येत असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी संघटना व शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.
अळ्या झालेल्या जुन्या पिठाच्या पोळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने १८ आॅक्टोबर रोजी ३२ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. सदर प्रकरणाला लोकमतने उचलून धरल्याने प्रशासन खळबळून जागे झाले होते. याची चौकशी झपाट्याने करण्यात आली. परंतु या प्रकरणात दोषी असलेल्यांना सोडून निर्दोषांवर वेतनवाढीची कारवाई करण्यात आली.
सदर प्रकरण मिटत नाही तर याच शाळेत बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला गर्भधारणा झाल्याचे उजेडात आले. याची झळ गावकरी व पालकांमध्ये पोहोचली तसेच या प्रकरणाचा विपरित परिणाम होऊन आपल्या पाल्यांना या शाळेत कसे शिकवावे? अथवा वसतिगृहात कसे ठेवावे, असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर उभे ठाकले आहेत. मजेची गोष्ट म्हणजे याही प्रकरणात प्रकल्प अधिकाऱ्यांचे दोषींच्या डोक्यावर हात असल्याचा आरोप होत आहे.
एका पाठोपाठ एक प्रकरण घडत असूनही शाळा प्रशासनावर कारवाई न करता हेही प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून होत असून मोबदल्यात मोठी देवाण-घेवाण झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. यास जबाबदार असलेले मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका तसेच प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघटना शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करणार, असे लेखी निवेदनातून कळविले आहे.
सदर प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची चौकशी करून अप्पर आयुक्तांकडे अहवाल सादर केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Saras Sarasarava in the name of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.