निराधारांच्या मदतीसाठी सरसावली यशोदा व उडान संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:00 AM2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:16+5:30
महिनाभरापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तूची किट तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्था व यशोदा बहुद्देशीय विकास संस्थेच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.२७) वाटप करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने महिनाभरापासून घरातच लोक अडकलेले आहेत. महिनाभरापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तूची किट तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्था व यशोदा बहुद्देशीय विकास संस्थेच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.२७) वाटप करण्यात आल्या.
पदमपूर येथील गरजूंना पहिल्या टप्प्यात तेल, तिखट, मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, हरभरा, हळद, आंघोळ व कापड धुण्याचे साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून महेंद्र मेश्राम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्राम पदमपूर, पोवारीटोला, गोंडीटोला, आमगाव, किडंगीपार, बोथली, रिसामा, कुंभारटोली, माल्ही येथे पुढेही किटचे वाटप केले जाणार आहे. संस्थेचे सदस्य आपल्या खर्चातील पैसे जमा करून गरजूंच्या मदतीसाठी पुढे आल्याने त्यांना प्रशांत मेश्राम, डॉ. हेमंत फुंडे, महेंद्र मेश्राम, चंद्रकुमार हुकरे, ग्रामसेवक रितेश शहारे, मनिष बहेकार,निलेश बेहकार सहकार्य करीत आहेत.
समाजऋण फेडण्यासाठी यशोदा संस्थेचे अध्यक्ष हरिष भुते, उडाणचे अध्यक्ष आशिष तलमले, विजय कोरे, अतुल फुंडे, प्रेमानंद पाथोडे, रविकांत पाऊलझगडे, सुनील हुकरे, नरेश येटरे, बोथलीचे सरपंच राजकुमार चव्हाण, नरेश रहिले, नरेश बोहरे, दिपक भांडारकर, हिमालय राऊत व इतर सदस्य सामाजिक अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.