बिरसी येथील सरपंच पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:30+5:302021-02-23T04:45:30+5:30
गोंदिया : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवीत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी तालुक्यातील बिरसी (कामठा) येथील सरपंच ...
गोंदिया : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवीत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी तालुक्यातील बिरसी (कामठा) येथील सरपंच इंदू राकेश वंजारी यांना त्वरित पदावरून दूर करण्याचे आदेश काढले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदू वंजारी यांनी यश संपादन करीत बिरसीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. परंतु त्यांचे पती राकेश वंजारी यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांचे सरपंचपद बरखास्त करण्यात यावे, अशी तक्रार लक्ष्मीप्रसाद वंजारी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नुकताच आपला निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सरपंचाचे पती यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच इंदू वंजारी यांना त्वरित पदावरून दूर करण्याचे आदेश काढले आहेत.