सरपंच पतीच करतोय ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:14+5:302021-09-26T04:31:14+5:30
लोहारा : महिला सरपंच असल्यास त्यांच्या पतीला ग्रामपंचायतच्या कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही, असे शासन आदेश आहेत. मात्र या ...
लोहारा : महिला सरपंच असल्यास त्यांच्या पतीला ग्रामपंचायतच्या कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही, असे शासन आदेश आहेत. मात्र या विपरीत परिस्थिती ग्राम डोंगरगाव येथे आहे. येथील सरपंचाचे पतीच ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करीत आहेत. निकृष्ट काम होत असल्याने गावकऱ्यांनी ते काम थांबविले. मात्र त्यानंतर आता परत काम सुरू करण्यात आले असून. अशात सरपंच व सरपंच पतीवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सन २०१७-२०१८ मध्ये १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत इमारतकरिता पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे काम महिला सरपंचाचे पतीच करीत असल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. त्यातच सन २०१७ -२०१८ मध्ये ग्रामपंचायतीच्या इमारतीचे मंजूर बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु ते काम सरपंच पतीच्या हस्ते झाले असून निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने गावकऱ्यांनी कामबंद केले होते. ते काम अर्धवट सोडत ग्रामसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या कामाचे दोन लाख रुपयांचे बिलही काढण्यात आले. त्यानंतर अर्धवट सोडलेल्या कामाला सप्टेंबर २०२१ मध्ये सरपंच पतीने ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्य व गावकऱ्यांना विचारणा न करता काम सुरू केले. यामुळे गावातील नागरिकांनी आरोप करीत संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, सरपंच पतीने स्वतः ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करीत असल्याचे फोनवर बोलताना कबूल केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
----------------------------
सन २०१७-२०१८ या वर्षातील १४ व्या वित्त आयोगाचे काम असून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत करीत आहे. निकृष्ट कामाबद्दल अभियंत्याला जाणीव करून दिली आहे.
एन.जी.राठोड, ग्रामसेवक
-------------------------------
ग्रामपंचायत इमारत बांधकाम सुरू असताना आम्ही महिला सरपंचाना विचारणा केली. यावर महिला सरपंचाचे पती आम्हाला अरेरावीची भाषा करीत काम माझे आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्ही माझे काही करू शकत नाही असे बोलत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाची चौकशी करून दोषी सरपंच व त्यांच्या पतीवर कारवाई करावी.
कोमेंद्र मेंढे, गावकरी
---------------------------------
मी उपसरपंच असून सरपंच व ग्रामसेवकांनी कुणालाही विश्वासात न घेता कामाला सुरुवात केली. या इमारतीच्या कामाला दोनदा थांबविण्यात आले होते. परंतु सरपंचानी जोरजबरीने कामाला सुरुवात केली.
रमेश मडावी, उपसरपंच
-----------------------