सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार
By Admin | Published: September 12, 2016 12:30 AM2016-09-12T00:30:17+5:302016-09-12T00:30:17+5:30
जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
पांढरी : जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
ग्रामपंचायत कार्यालय गोंगले येथे १५ नोव्हेंबर २०१२ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वार्ड नं.३ मधील जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार दामिनी सावळराम गावढ यांची सर्वानुमते सरपंच पदावर निवड केली होती. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी यांनी मात्र प्रमाणपत्र मागितले होते. तेव्हा सदर सरपंचाने तहसील कार्यालय येथे जात प्रमाणपत्र दिले असता त्यामध्ये त्रुट्या असल्याने ते प्रकरण परत करण्यात आले होते.
परंतु सदर सरपंचाने दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई केली नाही. परिणामी त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यामार्फत कसलीही कारवाई होवू शकते. शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्वी निवडणूक झालेल्या दिवसांपासून सहा महिन्यामध्ये जात प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी माहितीच्या आधारावर तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती मागितली असता सदर प्रकार निदर्शनास आला. दामिनी सावळराम गावढ यांनी जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्र ठरल्याची कारवाई होवू शकते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा गोंगले येथील सरपंच यांची चौकशी झाल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)