सरपंचाला जि.प. सदस्याची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:07 AM2017-11-23T00:07:23+5:302017-11-23T00:07:50+5:30
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना...
ऑनलाईन लोकमत
तिरोडा : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रोजी घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आतीलकर हे मागील दोन वर्षापासून रेतीघाटावर कंत्राटदार अवैध पटेल यांच्याकडे दिवानजी म्हणून काम पाहतात. मंगळवारी (दि.२१) जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी घाटकुरोडा येथील रेतीघाटावर येवून त्यांना ५ लाख रुपयांची मागणी केली. मात्र ती पूर्ण न केल्यामुळे त्यांनी बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप सरपंच आतीलकर यांनी केला आहे. आतीलकर सध्या तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतिलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नियमितपणे कामावर गेले असता जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी रेतीघाट चालू ठेवायचा असेल तर ५ लाख रुपये दयावे लागतील असे सांगत ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आतीलकर यांनी केला. मात्र ते न दिल्याने बाचाबाची झाली यावरुन त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याच दिवशी मुंडीकोटा येथे ग्रामपंचायतमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. पण कोरम अभावी स्थगीत करण्यात आली. तेवढ्यात छातीत दुखल्याने मला मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. याची पोलिसात तक्रार केल्याचे आतीलकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ११ पैकी भाजपाचे सात सदस्य व सरपंच निवडून आले.
त्यात एका पक्षाला अपयश आले. त्यातूनच हा वाद झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर यातील खरे सत्य बाहेर येईल.
पैशाच्या मागणीचा आरोप बिनबुडाचा
यासंदर्भात जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता या रेतीघाटावर अवैध रेतीचे उत्खनन होत आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांचे फोन आले असता मी घाटकुरोडा रेती घाटावर चौकशीकरिता गेलो होतो. तिथे याबाबत विचारणा केली. वरिष्ठांसह मोबाईलवर बोलत असताना कृष्णा भांडारकर व इतर लोकात भांडण झाले. ५ लाख रुपयांची मागणी कुणीही कुठेही केली नाही. आतीलकर यांनी लावलले सर्व आरोप बिनबुडाचे आहेतत. त्यांनी ही मागणी सिद्ध करुन दाखवावी अन्यथा आपण अबू्र नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले.