रहांगडाले यांच्या मध्यस्थीने सरपंचांचे उपोषण मागे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:20+5:302021-02-14T04:27:20+5:30
तिरोडा : तालुक्यातील मुंडीकोटा ग्रामपंचायतचे सरपंच कमलेश आतीलकर यांच्यासह इतर सरपंचानी घरकुलासह इतर मागण्यांना घेवून मागील पाच दिवसांपासून येथील ...
तिरोडा : तालुक्यातील मुंडीकोटा ग्रामपंचायतचे सरपंच कमलेश आतीलकर यांच्यासह इतर सरपंचानी घरकुलासह इतर मागण्यांना घेवून मागील पाच दिवसांपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सरपंचानी शनिवारी (दि.१३) आपले आंदोलन मागे घेतले.
ग्रा.पं.मधील सन २०१८ मधील प्रपत्र ड मधील पात्र सुटलेल्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करणे, आरसीसी असो किवा नसो याची अट घरकुलाकरिता शिथिल करणे, शंभर दिवसात घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी रेती उपलब्ध करणे, ग्रा. पं. ठरावावर त्वरित पं.स.मध्ये दखल घेण्यात यावी, घरकुल लाभार्थ्यांकरिता कवलेवाडा घाटातून रेती पुरवठा करणे, इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात तिरोडा तालुका सरपंच संघटनेतर्फे मुंडीकोटा सरपंच कमलेश आतीलकर व कवलेवाडा सरपंच किरण पारधी यांनी पंचायत समिती आमरण उपोषणावर बसले होते. शनिवारी आ. विजय रहांगडाले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सरपंचाच्या संपूर्ण मागण्या शासनाकडे पाठवून पूर्ण करण्यासंदर्भात तिरोडा उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे, प्रकल्प अधिकारी हरिनखेडे, नायब तहसीलदार नागपूरे,गटविकास अधिकारी शितेश पटले यांना बोलावून सांगितले. त्यानंतर उपोषणकर्त्याला निंबूपाणी पाजून त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी न.प.सदस्य राजेश गुणेरीया, माजी जि.प.सदस्य कैलास पटले, राजलक्ष्मी तुरकर पं.स. सदस्य डॉ. बी.एस.रहांगडाले, भाजप शहर महामंत्री दिगंबर ढोक, ओबीसी आघाडी महामंत्री डिलेश पारधी, रमाकांत खोब्रागडे, अतित डोंगरे व तालुक्यातील संघटनेचे सर्व सरपंच उपस्थित होते.