आमदारांच्या कार्यालयासमोर सरपंचांचे ठिय्या आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:36+5:302021-09-24T04:34:36+5:30

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा ग्रामपंचायतींनी करावा, असा चुकीचा निर्णय ...

Sarpanch's sit-in agitation in front of MLA's office () | आमदारांच्या कार्यालयासमोर सरपंचांचे ठिय्या आंदोलन ()

आमदारांच्या कार्यालयासमोर सरपंचांचे ठिय्या आंदोलन ()

Next

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा ग्रामपंचायतींनी करावा, असा चुकीचा निर्णय शासनाने घेतला. याविरुद्ध तालुका सरपंच सेवा संघाने आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले आहेत.

आजतागायत ग्रामविकास मंत्रालयामार्फत जिल्हा परिषदेकडे पथदिव्यांच्या बिलांचा भरणा करण्यासाठी निधी दिला जायचा. या निधीतून ग्रामपंचायतींच्या विद्युत बिलाचा भरणा व्हायचा. मात्र शासनाने ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर घातली आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे २०१८ पासून ग्रामपंचायतीवर विद्युत बिल थकीत आहेत. शासनाने थकीत बिलांचा महावितरण कंपनीला भरणा केला नाही परिणामी ग्रामपंचायतीचे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्या पावसाळा व सणासुदीचे दिवस आहेत. गावागावांत पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वन्य श्वापदांचा धुमाकूळ असतो. यासंदर्भात राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार निवेदने सादर करण्यात आली. थकीत बिलांच्या भरणा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र तीन महिने लोटूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सरपंच संघटनेला हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून आ.चंद्रिकापुरे यांचे कार्यालयासमोर तालुक्यातील जनतेच्या हितासाठी सरपंच संघटना ठिय्या आंदोलन करीत असल्याचे सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष दादा संग्रामे यांनी सांगितले. आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या वेळी संघटनेने दिला आहे.

............

भजन, गायन करून वेधले लक्ष

सरपंचांचे हे ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने भजन, गायन करून सुरू आहे. ठिय्या आंदोलनासंदर्भात तहसीलदार विनोद मेश्राम, ठाणेदार सतीश जाधव, गटविकास अधिकारी निमजे, आ.चंद्रिकापुरे जनसंपर्क कार्यालयाचे आर. के. जांभुळकर यांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, सरचिटणीस अशोक कापगते,संजय खरवडे,प्रकाश शिवणकर, होमराज पुस्तोडे,डॉ.दीपक रहिले,भोजराम लोगडे,युवराज तरोने,कुंदा डोंगरवार,किशोर ब्राम्हणकर, विश्वनाथ बाळबुद्धे, लिलेश्वर खुणे आणि सरपंच सेवा संघाचे सरपंच उपस्थित होते.

230921\1733-img-20210923-wa0013.jpg

आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनात सहभागी सरपंच

Web Title: Sarpanch's sit-in agitation in front of MLA's office ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.