साठे महामंडळातील घोळाचे तार जिल्ह्यातही
By admin | Published: August 21, 2016 12:06 AM2016-08-21T00:06:33+5:302016-08-21T00:06:33+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या वित्तीय अनियमितता गैरव्यवहार व अपहारप्रकरणाचे तार जिल्ह्याशी जुळलेले असू शकतात.
सहकार्य करा : व्यवस्थापकांचे आवाहन
गोंदिया : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या वित्तीय अनियमितता गैरव्यवहार व अपहारप्रकरणाचे तार जिल्ह्याशी जुळलेले असू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोणी लाभार्थ्याला पूर्ण कर्ज रक्कम मिळाली नसेल किंवा कर्ज वितरणाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
या घोटाळ्यासंदर्भात मुंबईतील दहीसर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग नवी मुंबईमार्फत सुरु आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गोंदिया जिल्हा कार्यालयामार्फत सन २०१२--१३, २०१३-१४ व २०१४-१५ या कालावधीत एनएसएफडीसी, महिला समृध्दी व लघुऋण वित्त योजनेअंतर्गत थेट कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या कार्यालयात फलकावर लावलेली आहे. शिवाय संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पुढील आठवड्यात पोस्टर लावण्यात येणार आहे.
सदर कालावधीतील संबंधित लाभाथ्यांना पूर्ण कर्ज रक्कम मिळाली नसेल किंवा कर्ज वितरणाबाबत लाभाथ्यांची काही तकार असल्यास त्यांनी तपास अधिकारी, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, मुंबई यांच्याकडे दूरध्वनीवरून संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)