शनिवारचाच पाऊस खरा !
By admin | Published: July 4, 2016 01:22 AM2016-07-04T01:22:26+5:302016-07-04T01:22:26+5:30
पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता.
सरासरी ५१.१० मिमी. नोंद : पेरणीसह वृक्षारोपणालाही फायदा
गोंदिया : पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता. मात्र शनिवारी (दि.२) बरसलेल्या पावसाने ही पोकळी भरून काढली असून शनिवारी बरसलेल्या पावसानंतरच पावसाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५१.१० मीमी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारचाच पाऊस खरा असा सुर ऐकू येत आहे. विशेष म्हणजे रविवारीही (दि.३) शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसला.
जिल्ह्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत आहेत. आता खरीप हंगामाचा संपूर्ण भरवसा केवळ पावसावरच अवलंबून होता. शनिवार (दि.२) पूर्वीपर्यंत जिल्ह्यात केवळ १५ टक्केच बियाण्यांची पेरणी झाली होती. उन्हामुळे उगवलेल्या खारी वाळल्या व करपलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी थांबविली होती. कदाचित खरीप हंगाम लांबण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली होती. यावर्षी पावसाचा जोर चांगला असेल, असा हवामान खात्याचा अंदाजच फोल ठरण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत होती.
मात्र शनिवारी जिल्ह्यात बरसलेल्या सरासरी ५१.१० मिमी. पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसानंतर त्यांनी बियाणे पेरणीचा शुभारंभ केला आहे. रखडलेल्या पेरण्या पूर्ण करण्याच्या तयारीत शेतकरी गुंतला आहे. तर जिल्ह्याभरात होत असलेल्या वृक्षारोपण अभियानासाठी जमिनीतही ओलावा निर्माण झाल्याने त्यांचे संवर्धन होण्याचा विश्वासही बळावला आहे.
मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५१.१० मिमी पाऊस बरसला आहे. यात गोंदिया तालुका ७५ मिमी, तिरोडा तालुका ११०.८० मिमी, गोरेगाव तालुका ४४.२० मिमी, आमगाव तालुका ७५.८० मिमी, सालेकसा तालुका ४६ मिमी, देवरी तालुका १५ मिमी, सडक-अर्जुनी तालुका २८ मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४.२० मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी (दि.३) जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
आतापर्यंत सरासरी १९०.८० मिमी पाऊस
१ जून ते ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९०.८० मिमी पाऊस झालेला आहे. यात गोंदिया तालुका १४९ मिमी, तिरोडा तालुका २९९.९०, गोरेगाव तालुका १९८.२० मिमी, आमगाव तालुका १७०.६० मिमी, सालेकसा तालुका २०८.६० मिमी, देवरी तालुका १२७ मिमी, सडक-अर्जुनी तालुका १८०.२० मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आतापर्यंत १९३ मिमी पाऊस झालेला आहे.
गाय व बैलाचा मृत्यू
शनिवारच्या पावसामुळे कटंगटोला येथे दोन वीज पोल तुटून पडले. त्यामुळे करंट प्रवाहित होवून एका बैलाचा मृत्यू झाला. हिवराज नंदलाल लिल्हारे (रा.कटंगटोला) यांच्या मालकीचा बैल होता. तर हिवरा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून करंट लागून एका गाईचा मृत्यू झाला.