सटवा जि.प. शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 08:49 PM2019-03-28T20:49:31+5:302019-03-28T20:49:53+5:30
देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने याच वेळेत विद्यार्थी जेवनासाठी वर्गखोली बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. तीन दिवसात लागपोठ घडलेल्या दोन घटनांमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा असून पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळा असल्याने शाळा सकाळीत भरविल्या जात आहे. गुरूवारी (दि.२८) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास विद्यार्थी जेवनासाठी शाळेच्या आवारात बसले होते.
याच दरम्यान इयत्ता सातव्या वर्गाच्या खोलीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. मोठा आवाज झाल्याने शिक्षकांनी वर्गखोलीत जावून पाहिले असता स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग पडलेला आढळला. त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्या वर्ग खोलीत न बसण्याची सूचना दिली. तसेच केंद्रप्रमुख व गोरेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना याची माहिती दिली. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांधकामावर प्रश्नचिन्ह
सटवा येथील जि.प.शाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने इमारत बांधकाम आणि त्यात वापरलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुणवत्तेकडे दुर्लक्ष
इमारतींचे बांधकाम करताना जि.प.शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाचे सुध्दा लक्ष नाही. केवळ कंत्राट देऊन मोकळे होण्याच्या भूमिकेमुळे जि.प.शाळेच्या इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतला आॅगस्ट महिन्यात पत्र दिले होते. मात्र अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. शाळेची इमारत जुनी नसून आठ ते दहा वर्षांपूर्वीच बांधण्यात आली आहे.
- एन.सी.बिजेवार, मुख्याध्यापक, जि.प.शाळा सटवा
शाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ दहा वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. इमारत जीर्ण देखील झालेली नाही. अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने याची माहिती जि.प.शिक्षण विभागाला देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येईल.
- चंद्रशेखर भगत, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सटवा.