मशागतीच्या कामांना उन्हाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 09:22 PM2018-05-08T21:22:23+5:302018-05-08T21:22:23+5:30
एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापुर्वीपासून बळीराजा खरीपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदि कामे तो करीत असतो.
परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. ही कामे केव्हा व कधी होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पारा भडकला आहे, ही उष्णता कधी कमी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या उष्णतेची झळ पोहोचत असली तरीही काही शेतकरी सकाळी-सकाळी शेतीची कामे उकरण्यात मग्न दिसून येत आहेत. शेतकरी शेतीच्या कामांना एकएक करुन करण्याच्या प्रयत्नात आहेत. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेतीची पूर्वमशागत त्वरित करवून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.