दहावी, बारावीच्या मूल्यमापनावर सावरकर यांनी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:23+5:302021-06-25T04:21:23+5:30
केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या ...
केशोरी : राज्यात कोरोना विषाणूचा वाढलेला प्रकोप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. परंतु अजूनही अनेक शाळांनी परिपत्रकाचे वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही. निकाल जाहीर करण्यात अडचण येऊ नये वेळेच्या आत निकाल जाहीर करता यावे, मूल्यमापन कार्याला गती यावी म्हणून नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शाळांना भेटी देऊन मूल्यमापनासंबंधी मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने पहिले ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी व बारावीचा निकाल शाळाअंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शाळांनी मूल्यमापन कसे करावे, याबाबतीत मार्गदर्शक प्रकटन परिपत्रक जारी केले आहेत. परंतु अजूनही कित्येक शाळांनी परिपत्रकाचे योग्य वाचन न करता मूल्यमापन प्रक्रिया केली नाही. त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवोदय हायस्कूल केशोरी, डॉ. राधाकृष्ण हायस्कूल कनेरी, जयदुर्गा हायस्कूल गौरनगर या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांना आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
.....
अडचणींचा वेळीच निपटारा करणार
शिक्षकांच्या सहकार्यानेच दहावी आणि बारावीचा निकाल निर्धारित वेळेच्या आत जाहीर करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजूनही काही शाळांनी परिपत्रक प्रकटनाचे वाचन योग्य पद्धतीने न केल्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया योग्य केली नाही. ज्या शाळांनी प्रकटनाचे वाचन करून समजून घेतले त्यांनी पद्धतशीर मूल्यमापन केल्याचे दिसून आले. मूल्यमापन संदर्भात कोणाला अडचणी आल्यास त्यांनी त्वरित फोनद्वारे संपर्क साधून अडचणी सोडविण्याचे शिक्षकांना आश्वासित केले.
......
बारावी निकाला संदर्भातील मूल्यमापन प्रक्रियेबाबतीत विचारणा केली असता शासन स्तरावर बैठका सुरू आहे. राज्य मंडळाकडून सूचना निर्देश प्राप्त होताच. मूल्यमापन प्रक्रिया पूर्णत्वास करण्यासंबंधी सांगण्यात येईल.
- माधुरी सावरकर, विभागीय सचिव नागपूर.