जंगल वाचविणे आता प्रत्येकाची जबाबदारी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:53+5:302021-04-09T04:30:53+5:30
सडक-अर्जुनी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोहमारा, जांभळी, कोसमतोंडी, सोंदड, शेंडा, रेंगेपार, डेपो-डोंगरगाव, डव्वा, पितंबरटोला, पुतळी आदी परिसरातील जंगल ...
सडक-अर्जुनी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोहमारा, जांभळी, कोसमतोंडी, सोंदड, शेंडा, रेंगेपार, डेपो-डोंगरगाव, डव्वा, पितंबरटोला, पुतळी आदी परिसरातील जंगल जळाल्याच्या घटना पाहावयास मिळत आहे. लागलेल्या आगीच्या घटना या नैसर्गिक की मानवनिर्मित या आता महत्त्वाच्या नाहीत. जनतेच्या लोकसहभागातून आगी विझविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जंगल वाचेल तरच प्राणी वाचतील म्हणूनच जंगल वाचविणे ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे.
तालुक्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्य, एफडीसीएम, वन विभागाचा परिसर यामुळे आता वनवैभवाने नटलेला तालुका म्हणून ओळखला जात आहे. विविध प्रजातींच्या वन औषधी, मौल्यवान प्रजातींची झाडे पाहावयास मिळतात. जंगलात वन औषधी मिळाली तेही नैसर्गिक देण आहे. तालुक्यातील वनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोरगरीब शेतकरी, शेतमजूर अशा अनेकांना रोजगार मिळत आहे. तेंदूपत्ता, मोहफूल, वनाैषधी, गौण खनिज या सगळ्या आर्थिक बाबींसोबतच स्वच्छ नैसर्गिक वातावरण निर्मितीकरिता वनांची नितांत गरज आहे. तालुक्यातील ७५ टक्के वनक्षेत्र वनाने व्यापले आहे. घनदाट जंगल म्हणून आजही नवेगाव-नागझिरा अभयारण्याची ओळख देशपातळीवर आहे. त्यातील वन्य प्राण्यांची वाढती संख्या पाहून पूर्व विदर्भातील पर्यटकही मोठ्या संख्येने बकी गेट मार्गे नवेगाबांधला येताना दिसत आहेत. यासाठी प्रत्येकाने वनांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे.
.....
लोकसहभागाची गरज
सडक अर्जुनी वन परिक्षेत्रातील जंगल १८,६०० हेक्टर आर. क्षेत्रात व्यापले आहे. तर वनविकास महामंडळ जांभळीचे क्षेत्र ८,६०३ हेक्टर आर. क्षेत्रात व्यापले असून डेपो-डोंगरगाव वन परिक्षेत्रातील १९०० हेक्टर आर. क्षेत्रात व्यापले आहे. वन्यजीवांचे नवेगाव-नागझिरा अभयारण्य हे १३,००० हेक्टर आर. क्षेत्रात व्यापले आहे. वन विभाग, वन विकास महामंडळ व वन्यजीव विभागाच्या माध्यमातून जवळ-जवळ प्रत्येक गावात वन समिती, वन व्यवस्थापन समिती तयार करण्यात आल्या आहेत. त्यात काही ठिकाणी तर फक्त नावापुरत्याच समित्या ठरल्या आहेत. खऱ्या अर्थाने गावातील लोकसहभाग हा समित्यांच्या माध्यमातूनच पुढे येण्याची गरज आहे.
............................
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात आग लागू नये यासाठी कर्मचारी, बारमाही, वनमजूर व हंगामी मजुरांची खरी कसरत आहे. आमचा प्रत्येक कर्मचारी दक्ष असल्यामुळे आगीच्या घटनेत घट झाली आहे.
विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी
....
वन विकास महामंडळ परिसरात सध्या आगीचे तांडव सुरू असताना मार्च महिन्यात जास्त आग लागल्याने या नैसर्गिक की मानवनिर्मित याचे चिंतन करण्याची गरज आहे.
अभिजित देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी
..................................
सडक-अर्जुनी वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोहमारा येथे तिन्ही वन विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची वनाला आग लागू नये यासाठी फेब्रुवारी महिन्यात जनजागृती विषयक बैठक घेण्यात आली. त्यात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
राजेश पाचभाई, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी
...........................