बचत गट महिलांचे कौशल्य पडद्यामागेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 01:01 AM2017-04-04T01:01:02+5:302017-04-04T01:01:02+5:30
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील स्वयंम सहायता बचत गट व कारागीरांनी तयार केलेल्या मालांची ...
खर्च सात लाखांवर : प्रचाराअभावी प्रदर्शनीत विक्री केवळ १ लाख १२ हजारांची
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील स्वयंम सहायता बचत गट व कारागीरांनी तयार केलेल्या मालांची वस्तु प्रदर्शनी व विक्रीसाठी पलाश जिल्हास्तरीय प्रदर्शनी सुभाष मैदान गोंदिया येथे २७ ते ३१ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आले होते. परंतु या प्रदर्शनीचा योग्यरित्या प्रचार प्रसार न झाल्यामुळे या प्रदर्शनीकडे नागरिक भटकलेच नाही. या प्रदर्शनीवर खर्च मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र मिळकत सोडा संपूर्ण प्रदर्शनीतील मालाची विक्री फक्त १ लाख १२ हजारावर गेली आहे.
ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्याच्या मालाला शहरात भाव मिळावा, लोकांना त्यांचे कौशल्य माहित व्हावे, यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी प्रदर्शनीत आयोजित करण्यासाठी १० लाखाचे नियोजन जिल्हा नियोजनातून करण्यात आले.
२७ ते ३१ मार्च या पाच दिवसाच्या काळात या आयोजित प्रदर्शनीत कडधान्य, पापड, पत्रावळी, झाडू, अगरबत्ती, हस्तकला, बांबु पासून तयार केलेल्या वस्तु, खोवा, तुप, हळदी, मिर्ची पूड, मसाले, लोणचे अशा विविध वस्तु या प्रदर्शनीत निरीक्षणासाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनीची जबाबदारी प्रकल्प संचालक विजय जवंजाळ यांच्यावर सोपविण्यात आली होती. परंतु या प्रदर्शनीची व्यवस्थीतरित्या प्रचार प्रसिध्दी न झाल्यामुळे जनतेला प्रदर्शनीची माहिती कळू शकली नाही. परिणामी ६ ते ७ लाखावर खर्च झालेल्या या प्रदर्शनीला नागरिकांची भेट होऊ शकली नाही. परिणामी पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनीत फक्त १लाख १२ हजार ६४५ रुपयाची विक्री झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
दोन आॅटोचा प्रचार तीन दिवस
प्रचार प्रसिध्दीवर शासन पैसा खर्च करतो. आयोजित केलेला प्रदर्शनीची फलश्रृती व्हावी यासाठी प्रकल्प संचालक विजय जवंजाळ यांच्याकडून कसलीही मेहनत घेण्यात आली नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकारी व्ही.एम.सलामे यांच्यावर जबाबदारी टाकून मोकळे झाले. त्यामुळे सलामे यांनी दोन आॅटो तीन दिवस प्रचारासाठी गोंदिया शहरात लावले होते याची माहिती दिली, परंतु हे आॅटो प्रदर्शनीपूर्वी फिरले की प्रदर्शनी सुरु असताना शहरात फिरले याची माहिती देण्यात आली नाही. प्रदर्शनी झाली पण बिल न आल्यामुळे प्रदर्शनीवर खर्च किती झाला हे सांगता येत नाही हे एकच उत्तर ग्रामीण जीवनोन्नती हा अभियान चालविणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आहे.
सहा ते सात लाख खर्च
पलास जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी जिल्हा नियोजनातून १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रदर्शनीसाठी लावण्यात आलेले डेकोरेशन व पाण्यासाठी ३ लाख ९१ हजाराचा कंत्राट देण्यात आला होता. स्टेशनरी व इतर खर्च ही मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. या प्रदर्शनीतील ८५ स्टॉलवर असलेल्या १७० व्यक्तींना प्रतिदिवस १५० रुपयाप्रमाणे मजूरी देण्यात आली. या १७० व्यक्तीची पाच दिवसाची मजूरी १ लाख २७ हजार ५०० रुपये जाते. या व्यतीरिक्त येणाऱ्या अतिथीचा सन्मान व इतर खर्च असा ६ ते ७ लाख रुपये प्रदर्शनीवर खर्च झाला आहे. परंतु अद्याप ही या प्रदर्शनीवर किती खर्च झाले हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गुपीत ठेवले आहे. विक्री झाल्याची माहिती देण्यात आली. ही विक्री अत्यंत कमी असल्यामुळे खर्च कमी की अधिक दाखवायचा या विवंचनेत तर ही यंत्रणा नाही ना असा प्रश्न पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.