बचत गटाच्या महिलांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:07 AM2017-10-07T01:07:57+5:302017-10-07T01:08:12+5:30
‘स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत’ या संकल्पाने संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील बचत गटाच्या महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता ....
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : ‘स्वच्छ मिशन, स्वच्छ भारत’ या संकल्पाने संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील बचत गटाच्या महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबविली व गावाला स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला.
महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी लोक संचालित साधन केंद्र साखरीटोला तसेच संजीवनी ग्रामसंस्था कारुटोला यांच्या विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा व २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी सरपंच राया फुन्ने होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा पत्रकार प्राचार्य सागर काटेखाये, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच नंदकिशोर चुटे, अनिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष बोहरे, धनलाल कोरे, संयोगिनी उषा पटले, संजीवनी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चारुमती बोहरे, उज्ज्वला नंदेश्वर, कुंदा टेंभरे, लता पटले, ललीता बोहरे, वनिता बोहरे, बबीता टेंभरे, छाया कटरे, सिंधू गजभिये, अंजूलता बोम्बार्डे उपस्थित होते.
सर्वप्रथम महिलांनी गावातून प्रभात फेरी काढली. त्यासोबत महिलांनी हातात झाडू घेवून गावातील प्रत्येक गल्ली झाडून काढली व संपूर्ण गाव स्वच्छ केला. तसेच स्वच्छतेचे नारे लावण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. त्या बरोबरच बचत गटाच्या प्रमुख महिलांनी बचत गटातील आर्थिक विकासाचा आढावा घेतला व बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे होणारे स्वावलंबन व सक्षमीकरण याबद्दल विचार व्यक्त केले.
कारुटोला येथे एकूण १७ बचत गट आहेत. या बचत गटांद्वारे विविध महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून घरकामाव्यतिरिक्त इतर कार्यात व व्यवसायात बºयाच महिला आघाडी घेत असल्याने कुटुंबाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. महिलांचे ‘चूल व मूल’ हे कार्य कधीचेच मागे पडले असून विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवित असल्याचे मत प्राचार्य काटेखाये यांनी व्यक्त केले.
संचालन गीता गोंडाणे तर आभार छाया कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले बचत गट, निर्मल, प्रज्ञा, लक्ष्मी, लोकसेवा, परिवर्तन, शारदा, विश्वास, संजीवनी, प्राजक्ता, महात्मा फुले, सकाळ, आराधना, दया, जिजामाता, दैनिक बचत गटाच्या महिला व इतर महिलांनी सहकार्य केले.