अ.जा. कल्याण समितीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:07 PM2018-01-21T21:07:27+5:302018-01-21T21:07:48+5:30
जिल्ह्यात १८ जानेवारीपासून असलेला अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत १५ आमदार व अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात १८ जानेवारीपासून असलेला अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत १५ आमदार व अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा केला. प्रत्येक विभागाच्या अनुसूचित जमातीशी संबंधित विकास कामांचा व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून विविध ठिकाणी भेटी देवून लाभार्थ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात आलेल्या या समितीचा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी स्थानिक विश्रामगृहात सत्कार केला.
या वेळी पालकमंत्र्यांनी, या समितीच्या दौऱ्यांमुळे अनुसूचित जमातीचे निश्चितच कल्याण होईल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी, समितीने आपले कार्य पार पाडले असून येत्या काही दिवसांत निश्चित चांगले बदल घडून येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते, आ. डॉ. अशोक उईके, समितीचे सदस्य आ. संजय पुराम, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कर धनारे, आ. शांताराम मोरे, आ. अमित घोडा, आ. डॉ. संतोष टारफे, आ. वैभव पिचड यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. आभार माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी मानले. यावेळी जि.प. सभापती छाया दसरे, लायकराम भेंडारकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.