तापमान ठरवित आहे प्रचार सभांचे शेड्युल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:23 PM2018-05-13T21:23:31+5:302018-05-13T21:23:31+5:30
निवडणूक आयोगाने भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर केली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदा तापमान चाळीेस अंशाच्यावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांना प्रचार सभांचे शेड्युल ठरविताना तापमानाचा विचार करणे भाग पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणूक आयोगाने भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर केली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदा तापमान चाळीेस अंशाच्यावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांना प्रचार सभांचे शेड्युल ठरविताना तापमानाचा विचार करणे भाग पडत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रचार सभांना गर्दी कमी होवू शकते. तसे झाल्यास प्रचाराला फटका बसू शकतो.त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात बहुतेक सर्वच प्रचार सभांची वेळ सायंकाळी ठेवली जात आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार करण्यासाठी केवळ दहा ते बारा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचता यावे, यासाठी रोड शो, रथ यात्रा आणि दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा घेवून मतांचा जोगवा मागणे सुरू केले आहे. भाजपाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसºयाच दिवसांपासून प्रचाराचा धडका सुरू केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सुध्दा प्रचाराला सुरूवात केली आहे. माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिल्याने भाजपासाठी ही जागा कायम ठेवणे प्रतिष्ठेचे झाले आहे. तर ही पोटनिवडणूक २०१९ च्या निवडणुकींची नांदी असल्याने व पटोले यांनी ज्या टंशनमध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यादृष्टीने त्यांना आपली धमक दाखवून देण्यासाठी काहीही झाले तरी भाजपाचा उमेदवार विजयी होणार नाही, यासाठी सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यामुळेच भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. सध्या तरी निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात प्रचार सभांचा धडका सुरू केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी २४ उमेदवार जरी रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्येच होणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची असल्याने यात नेमकी कोण बाजी मारणार हे या मतदार संघातील मतदारराजा ठरविणार आहे.
निवडणुकीला सोशल टच
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून निवडणुकीत सोशल मिडियाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी फेसबुक, व्हॉटसअॅप वरुन उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर विविध पोस्ट टाकून मतदारांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच या निवडणुकीला सोशल टच असल्याचे दिसून येत आहे.
दिग्गज उमेदवारांच्या सभा
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाने ही पोटनिवडणूक फार प्रतिष्ठेची केली आहे. काहीही झाले तरी ही जागा भाजपाकडून जावू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे फिल्डींग लावली आहे. त्याकरिता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपुरातील दिग्गज भाजपा नेते या दोन्ही जिल्ह्यात महिनाभरापासून तळ ठोकून आहेत. तर उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर दिग्गज मंत्री आणि नेत्यांच्या सभा या दोन्ही जिल्ह्यात होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा संपूर्ण ताकदीने प्रचाराला सुरुवात केली आहे.