भर उन्हात सुटणार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:34 PM2018-03-23T22:34:04+5:302018-03-23T22:34:04+5:30
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. दरवर्षी सकाळीपाळीत शाळा म्हटले की सकाळी ७.३० ते १०.३० ही वेळ असायची. परंतु यंदा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आली आहे.
दरवर्षीपेक्षा तब्बल १ तास ४५ मिनीटे विद्यार्थ्यांना जास्त वेळ शाळेत राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आरटीईच्या निकषानुसार तासीका पूर्ण होतील असे ठरवून शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही वेळ वाढवून त्या वेळेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे मात्र चिमुकले विद्यार्थी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वच शाळांतील विद्यार्थी पायी शाळेत जातात. यातही विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांच्या पायात चप्पलही नसते. उघड्या पायाने शाळेत येणारे विद्यार्थी भर उन्हात शाळेतून बाहेर पडतील.
सद्यस्थितीत गोंदियाचे तापमान ३८ अंशाच्या घरात आहे असून दररोज तापमानात वाढ होत आहे. परंतु शिक्षण विभागाने वाढत्या तपामानाकडे दुर्लक्ष करून दरवर्षीच्या वेळेला तिलांजली देऊन भर उन्हात शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या चुकीचा निर्णय असतानाही जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व अधिकारीही गप्प बसले आहेत. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक बोंबा ठोकत आहेत.
उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?
वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होऊ शकतो. या उष्माघातामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. आपला उदोउदो करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग वेठीस धरत असल्याची प्रतिक्रीया जनमाणसात आहे.
अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी सुटीच्या दिवशी सभा
रविवारी (दि.२५) सुटी असतानाही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग १ ते ८ च्या भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची मूलभूत क्षमता विकासासाठी स्तर निश्चीती कार्यवाही व पुढील नियोजन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार व विद्या प्राधीकरणचे संचालक सुनिल मगर या सभेला उपस्थित राहणार आहेत असे सांगून सुटीच्या दिवशीही विशेष म्हणजे रामनवमी असतानाही सभा बोलाविण्यात आली आहे. यामुळे शिक्षक व कंत्राटी कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.