गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जलाशयावर भरतेय पक्ष्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:42 PM2019-11-18T15:42:55+5:302019-11-18T15:47:01+5:30

नवेगावबांध परिसरातील जलाशयावर परदेशी पक्ष्यांची शाळा भरायला सुरूवात झाली असल्याचे आल्हाददायक चित्र आहे.

A school of birds is filling the lake in the Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जलाशयावर भरतेय पक्ष्यांची शाळा

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जलाशयावर भरतेय पक्ष्यांची शाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे सातासमुद्रापलिकडून आगमननिसर्गप्रेमींसाठी पर्वणी

संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : थंडीची चाहूल लागताच जिल्ह्यात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. नवेगावबांध परिसरातील जलाशय परिसरात विविध प्रजातीचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पक्षी तज्ज्ञ आणि पर्यावरणाप्रेमींसाठी ही एक प्रकारची पर्वणीच असते. मागील पंधरा वीस दिवसांपासून थंडीला सुरूवात झाली असून परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नवेगावबांध परिसरातील जलाशयावर परदेशी पक्ष्यांची शाळा भरायला सुरूवात झाली असल्याचे आल्हाददायक चित्र आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल होतात. नोव्हेंबर महिन्यात या पक्ष्यांच्या आगमनास सुरूवात होते. त्यानंतर या पक्ष्यांचा तीन महिने या परिसरात मुक्काम असतो. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे हे पक्षी लक्ष वेधून घेतात.नवेगावबांध जलाशयावर मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे पाहयला मिळतात.नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची भ्रमंती करायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची एक पर्वणीच ठरते. दरवर्षी या परिसरात परदेशी पाहुणे दाखल होत असल्याची माहिती पर्यटकांना असल्याने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येथे ठिकाणी दूरदूरवरुन पर्यटक येथे भेट देतात. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला सुध्दा चालना मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर गर्दी करतात. यावर्षी सुद्धा त्यांच्या आगमनाला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. नवेगावबांध, नवनीतपूर क्र.१ चा फुटक्या तलाव व भुरसीटोला तलावात लक्षणीय वाढ झाली आहे. विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: आॅक्टोबर नोव्हेबंर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्यानाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलिया तसेच हिमालयकडून भारतात प्रवेश करतात. पूर्व विदर्भातील तलावांचा प्रदेश त्यांना अधिक सोयीचा वाटत असल्याने येथील पाणवठे, परदेशी पक्ष्यांनी दरवर्षीच बहरत असतात.खाद्य शोधणारे डब्लिंग डक आणि पाण्यात सूर मारुन खाद्य मिळविणारे डायव्हिंग डक या दोन प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश असतो. परंतु जलाशय व काठावर पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस होत आहे. सध्या नवेगाबांध परिसरातील नवनीतपूर आणि भुरसीटोला परिसरात परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे.

हे पक्षी आढळतात दरवर्षी
येथील विविध पाणवठ्यांवर पिंटलेस, ग्रेलग गुज, कॉमन पोचार्ड, वाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलार्ड गार्गनी, कोंब डक, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरोशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) आदी प्रजातीचे पक्षी या परिसरात दरवर्षी आढळतात.

अधिवास नसलेला परिसर अनुकुल
मासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना परदेशी पाहुणे अधिक पसंती दर्शवितात. अशा पाठवठ्यांवर पक्षांचे थवेच्या थवे दरवर्षी पाहयला मिळतात.येथे येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सायबेरियन पक्ष्यांची संख्या अधिक राहत असल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.

नवेगावबांध परिसरातील भुरसीटोला, नवनीतपूर जलाशयावर सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. पुढील दहा पंधरा दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे.
- अजय राऊत,
प्राध्यापक तथा पक्षी अभ्यासक अर्जुनी मोरगाव.

Web Title: A school of birds is filling the lake in the Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.