स्कूल बसचालकांना १५ महिन्यांपासून काम नाही; काहींनी शोधला भाजीपाल्यातून रोजगार, काही जण रोहयोच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:41+5:302021-06-09T04:36:41+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग मागील दीड वर्षापासून सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच्या झळा सर्वसामान्यांना बसल्या आहेत. यामध्ये ...

School bus drivers have not worked for 15 months; Some found employment in vegetables, some in Rohyo's work | स्कूल बसचालकांना १५ महिन्यांपासून काम नाही; काहींनी शोधला भाजीपाल्यातून रोजगार, काही जण रोहयोच्या कामावर

स्कूल बसचालकांना १५ महिन्यांपासून काम नाही; काहींनी शोधला भाजीपाल्यातून रोजगार, काही जण रोहयोच्या कामावर

Next

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग मागील दीड वर्षापासून सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच्या झळा सर्वसामान्यांना बसल्या आहेत. यामध्ये मात्र, सर्वात जास्त स्कूल बसमालक, चालकांना याचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दीड वर्षांपासून रोजगार नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, याच विवंचनेत स्कूल बसचालक, मालक आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कूल बसमालक आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटोचालकांना यांना आर्थिक फटका बसला. फेरीवाले, ऑटोरिक्षा चालकांना शासनाने मदत जाहीर केली; परंतु स्कूल बसचालकांना अजूनही आर्थिक मदत जाहीर न केल्याने अनेक स्कूल बसचालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली. नाइलाजास्तव अनेकांनी नियमित व्यवसाय सोडून पर्यायी व्यवसाय करण्यावर भर दिला. कुणी शेती कामाला तर कुणी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मागील दीड वर्षापासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कूलबसची चाके थांबलेलीच आहेत. कोट्यवधी रुपयांचा फटका या व्यवसायाला बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात ४१० स्कूलबस असून त्याच जागेवर स्कूलबस उभ्या असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

............................

जिल्ह्यात एकूण स्कूलबस : ४१०

मुले दररोज स्कूलने प्रवास करायचे- ५०००

जिल्ह्यातील एकूण स्कूल बसचालक- ५१८

......................................

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मागील वर्षीपासून कोरोनाचा कहर सुरूच असून आजही तो कायम आहे. गेल्या दीड वर्षापासून स्कूल व्हॅन जागीच उभ्या आहेत. त्यामुळे जगावे की मरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-राजेश शिवणकर, स्कूल व्हॅन चालक.

............................

कर्ज घेऊन स्कूल व्हॅन खरेदी केली. व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे स्कूल बस जागीच उभी आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते कसे फेडावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने याची दखल घेत आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

-राधेश्याम बहेकार, स्कूल व्हॅनचालक.

......................................................

लॉकडाऊनमुळे स्कूल बस, व्हॅन व्यवसायावर मोठी संकट आले. मागील दीड वर्षापासून स्कूल बस जागच्या जागीच उभी असल्याने सर्वांवरच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे हताश होऊन कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी भाजीपाला विकण्यास लागलो.

-धमेंद्र हरिणखेडे, स्कूल बसचालक.

......................................

दीड वर्षापासून हाताला काम नाही. संस्था संचालकही वेतन कुठून देणार? या सर्व बाबीचा विचार करता पोट भरण्यासाठी शेतीकडे व मिळेल ते काम करण्याकडे लक्ष वळविले आहे. शाळा सुरू झाल्यावर पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागू.

- योगेश गायधने, स्कूल बसचालक

.......................

शासनाने लॉकडाऊनच्या काळात ऑटोचालकांचा विचार करून त्यांना मदत जाहीर केली, तशी मदत आमच्यासारख्या स्कूल बसचालकांना करणे अपेक्षित होते; परंतु कामही सुरू नाही आणि शासनाची मदत नाही. त्यामुळे आमची आर्थिक स्थिती चांगली नाही.

- सदानंद गिरीपुंजे, स्कूल बसचालक

...............

मागण्या काय?

१) शाळा सुरू होईपर्यंत शासनाने स्कूल बसचालकांना दरमहा ३ हजार रुपये भत्ता द्यावा.

२) पर्यायी रोजगार उभा करून देण्यासाठी मदत करावी.

३) बाजारपेठ सुरू मग शाळा का सुरू नाही याकडे शासनाने लक्ष द्यावे.

४) कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेत शाळा सुरू कराव्यात.

Web Title: School bus drivers have not worked for 15 months; Some found employment in vegetables, some in Rohyo's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.