ठाणेदाराच्या आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:44 AM2018-08-25T00:44:58+5:302018-08-25T00:45:38+5:30
देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या रिक्त पदाला घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकºयांनी घेतली होती. अखेर चिचगडचे ठाणेदार यांच्या मध्यस्तीनंतर शुक्रवारी (दि.२४) चौथ्या दिवशी कुलूप उघडण्यात आले.
ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेत तीन महिन्याचा कालावधी लोटूनही दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी मागील तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. वांरवार शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करुन सुध्दा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकाची नियुक्ती केली नाही. गावकऱ्यांनी ८ आॅगस्टला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देवून शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.
मात्र शिक्षण विभागाने याला गांर्भियाने घेतले नाही.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी व पालकांनी २१ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शाळा बंद होती. शुक्रवारी (दि.२४) चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांनी ककोडी येथे पोहचून शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले. मात्र २७ आॅगस्टपर्यंत शिक्षकाची नियुक्ती न केल्यास पुन्हा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
दरम्यान या प्रकरणाची आ.संजय पुराम यांनी दखल घेत शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षणाधिकाऱ्यांना त्वरित यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मुख्याध्यापक आंदेलवाड यांना विचारणा केली असता त्यांनी एक शिक्षक रुजू झाले असून दुसरे शिक्षक रुजू होणार असल्याचे सांगितले.