शाळा संचालकांनी फीसाठी तगादा लावू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:06+5:302021-06-26T04:21:06+5:30
गोंदिया : सीबीएससी शाळा संचालकांकडून कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फीसाठी तगादा लावला जात आहे. सध्या सर्वसामान्यांना दैनंदिन खर्च करणे ...
गोंदिया : सीबीएससी शाळा संचालकांकडून कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फीसाठी तगादा लावला जात आहे. सध्या सर्वसामान्यांना दैनंदिन खर्च करणे त्रासदायक ठरत असतानाच शाळेची फी भरण्याची कित्येकांची ताकद नाही. शाळेची फी तीन ते चार टप्प्यांत घ्यावी; जेणेकरून पालकांना सोईस्कर होईल, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सरकारने शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षण देण्याचे ठरविले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. परंतु लॉकडाऊन काळात अनेक पालकांचा व्यापार व खासगी नोकरी गेल्यामुळे त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात पालक शाळेची फी पूर्ण न देता टप्प्या-टप्प्यात देण्याच्या स्थितीत असल्यावर शाळा संचालक त्यांच्यावर दबाव आणून फी देण्यास तगादा लावत आहेत. यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या माध्यमातून सीबीएससी शाळा संचालकांवर अंकुश ठेवून त्यांना पालकांवर जबरदस्ती न करता तीन ते चार टप्प्यांत सवलती प्रमाणे आपली फी घ्यावी, असे आदेश द्यावेत. तसेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने अशा गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली असून निवेदन दिले आहे. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘चला, अभ्यास करू या’ हा उपक्रम सुरू करीत असून आमच्या मार्फत सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरोघरी जाऊन त्यांना शिकवतील व त्यांची चाचणीही घेतील, असे सांगितले. निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोंदिया तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, कुणाल शहारे, अनिकेत रणगीरे व महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.