समाजभवनच झाले त्या विद्यार्थ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:02 AM2018-02-03T00:02:44+5:302018-02-03T00:02:59+5:30
गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली. मात्र पालकांनी आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी गावातील एका सुशिक्षित बेरोजगार युवकांनी स्विकारली. त्यामुळे गराडा येथील समाजभवन विद्यार्थ्यांची शाळा झाल्याचे चित्र आहे.
येथील शिक्षण विभागाने ३ जानेवारीला क्रांतोज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनीच कमी पटसंख्येचे कारण पुढे करीत गराडा येथील शाळा बंद केली. या विरोधात गावकरी व पालकांनी रोष व्यक्त केला. गावातील शाळा बंद करुन नये असा प्रस्ताव देखील गावकऱ्यांनी पारीत करुन जि.प.शिक्षण विभागाकडे पाठविला. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने नियम पुढे करीत व वरुनच आदेश असल्याचे सांगत येथील शाळा बंद केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणपासून वंचित राहण्याची वेळ आली. मात्र यानंतरही पालक डगमगले नाही.
लहान मुलांना जंगलातून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या शाळेत पायी पाठवायचे कसे, त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार, यापेक्षा त्यांनी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. गावातील सुशिक्षित तरुणांनी त्यांना शिकविण्याची जबाबदारी स्विकारली.
गराडा येथील शाळा बंद केल्याच्या विरोधात रोष व्यक्त केला. पण प्रशासनाला पाझर फुटला नाही. एक महिना वाट पाहून आता पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यालाच पत्र पाठविले. गराडा येथील शाळा सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा या पत्रातून दिला आहे. प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार कायद्याला मुठमाती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद केली. त्या शाळेतील ११ विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे समयोजन केले. पण, गराडा ते मुंडीपार प्राथमिक शाळेचे अंतर ३ कि.मी. चे आहे. मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न पालकांना पडला. मुलांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. नाईलाजाने पालकांनी त्या चिमुकल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पवित्रा घेतला.
मागील एक महिन्यापासून गराडा येथील ११ चिमुकले शाळेचत गेली नाही. मुंडीपारच्या प्राथमिक शाळेत गराडा शाळेतील मुले येत नाही. ही बाब प्राशसनाला माहित आहे, पण प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचचले नाही.
परीक्षेचे नियोजन कसे करणार
गराडा प्राथमिक शाळा सध्या समाजभवनात भरते. गावातील एका सुशिक्षीत बेरोजगाराने त्या ११ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी गराडा ग्रामपंचायतीने त्या सुशिक्षीत बेरोजगार शिक्षकाला ५ हजार रुपये मानधन देण्याचे ठरविले आहे. मात्र तीन महिन्यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेचे नियोजन गराडाचे पालक कसे करतील. विद्यार्थी परीक्षा कसे देतील हा प्रश्न आता पालकांना सतावित आहे.
पाल्यांसाठी पालकांची धडपड
शिक्षण विभागाने कमी पटसंख्येचे कारण देत गराडा येथील शाळा बंद केली. महिनाभराचा कालावधी लोटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे पालकांनी आता शाळा सुरू करण्याच्या मागणीला घेवून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासन केवळ हातावर हात ठेऊन आहे.