कोरोनाच्या सावटात सुरु होणार आजपासून शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:18+5:30
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करायचा आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे सॅनिटायझेशन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर खासगी शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सोमवारपासून (दि.२३) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील २७५ शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन, पालकांचे संमतीपत्र आदींचे पालन करीत कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु होणार आहे. मात्र प्रत्यक्षात किती शाळा सुरु होणार आणि किती विद्यार्थी येणार हे मात्र सोमवारीच स्पष्ट होईल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ९ महिन्यांपासून शाळा महाविद्यालय पूर्ण बंद आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याची बाब लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करायचा आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे सॅनिटायझेशन ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर खासगी शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक शाळांचे सॅनिटायझेशन मागील तीन चार दिवसांपासून सुरु आहे. शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहात फिजिकल डिस्टिन्सिंगचे पालन केले जावे यासाठी वर्तुळ आखण्यात आले आहे.
शाळेच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मर्जीने शाळेत पाठविण्यात येत असल्याचे संमत्तीपत्र पालकांकडून भरुन घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्यांचे प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून सॅनिटायझरची सुध्दा व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याला मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारपासून शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकांची यासर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी धडपड सुरु आहे. तसेच शाळेच्या प्रवेशव्दारावर कोरोनाविषयक जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहे.
टेस्ट पूर्ण न झालेल्या शाळा उशिरा सुरु होणार
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचे निर्देश असले तरी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेच्या शिक्षकांची कोरोना चाचणी झाली नसेल त्या शाळा त्यांची चाचणी पूर्ण झाल्यावरच सुरु करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख देणार भेटी
कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु होणार आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे. पथक सोमवारी विविध शाळांना भेटी तेथील सोयी सुविधांची पाहणी करुन आपला अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत.
खासगी शाळांना करावा लागणार खर्च
मागील नऊ महिन्यापासून शाळा बंद असल्याने व्यवस्थापनाच्या शाळांची आधी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात आता त्यांना शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहे. हा सर्व खर्च व्यवस्थापानाला करावा लागणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शाळा आणि विद्यालयांना देण्यात आली आहे. शिवाय मी स्वत: शाळांना भेटी देऊन याची पाहणी करणार आहे.
- प्रफुल्ल कछवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक.