८३८ शाळा झाल्या तंबाखू मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:28+5:30
कर्करोगासारखा असाध्य रोग हा तंबाखूपासून जडतो. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यसन व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविलेल्या तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात जिल्ह्यातील एक हजार ६८५ शाळांपैकी शासनाच्या ११ निकषात खऱ्या उतरणाऱ्या आता ८३८ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तंबाखूला जवळ येऊ देणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनाही देण्यात आली आहे. परंतु ११ निकषात अजूनही ८४७ शाळा बसल्या नाहीत.
कर्करोगासारखा असाध्य रोग हा तंबाखूपासून जडतो. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यसन व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एक हजार ६८५ शाळांपैकी ११ निकषपूर्ण करणाऱ्या अॅपवर एक हजार ४२२ शाळांनी नोंदणी केली. त्यातील एक हजार ३६१ शाळांनी स्वत:ला तंबाखू मुक्त दाखविले. परंतु त्या शाळा अजूनपर्यंत ११ निकषात न बसल्यामुळे त्यांना त्या अॅपद्वारे रद्द करण्यात आले. जिल्ह्यातील २६३ शाळांनी या अॅपवर नोंदणी केली नाही.
जिल्ह्यातील ८३८ शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. चुकीचे निषक भरलेल्या २५५ शाळांना तंबाखू मुक्तीत रद्द करण्यात आले असून २७७ शाळांची तपासणी करण्यात आली नाही.
तंबाखू मुक्त शाळा उपक्रम सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग व आरोग्य विभागद्वारे सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरच तंबाखू मुक्त घोषीत होतील व यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
राजकुमार हिवारे
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., गोंदिया.
हे ११ निकष पूर्ण करण्याची गरज
तंबाखू मुक्त शाळेसाठी शाळेच्या परिसरात तंबाखूच्या वापरावर बंदी, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धूम्रपान व तंबाखूचा उपयोग गुन्हा होत असल्याचे फलक शाळेच्या परिसरात लावणे, शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्यासंदर्भात पोस्टर लावणे, तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्यांवर लावणे, कोटपा २००३ कायद्यांची प्रत प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाकडे असणे गरजेचे आहे. नियुक्त नोडल आॅफिसर किंवा जिल्हा तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला किंवा मदत घेणे, शाळेच्या नियमित उपक्रमात तंबाखू नियंत्रणाचा समावेश करणे, शाळेच्या १०० मिटर परिसरात तंबाखू विक्रीला बंदी असल्याचे बोर्ड लावणे, तंबाखू नियंत्रण उपक्रमात जे विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापक प्रयत्न करीत आहेत त्यांचा सत्कार करणे, ‘आमची शाळा-तंबाखू मुक्त शाळा’चा बोर्ड प्रवेश द्वारावर लावणे अशा ११ निकषांचा समावेश आहे.